ऊसदरावरून गेले काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असतानाच उसाला २५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय वित्तमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले. ऊस आंदोलन पेटले असतानाच परस्पर तोडगा काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पट्टय़ात राष्ट्रवादीचे प्राबल्य कायम राहिल याची पुरेपूर खबरदारी घेतली तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कुरघोडी केली. तसेच खासदार राजू शेट्टी यांना एक पाऊल मागे घेणे भाग पाडले.
तीन हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या आंदोलनाला राजकीय वळण लागले होते. राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना शरद पवार यांनी जातीय रंग दिल्याने पवार यांना टीकेचे धनी व्हावे लागले. शेट्टी व राष्ट्रवादी यांच्यात जुंपल्याने काँग्रेसने बघ्याची भूमिका घेतली होती. पण शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला. आंदोलन चिघळल्यास बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला फटका बसू शकला असता. आधी दर वाढवून देण्यास राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या कारखानदारांनी विरोध दर्शविला होता. पण पवारांनी इशारा करताच सारे कारखानदार तयार झाले आणि पहिली उचल २५०० रुपये देण्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली.
विशेष म्हणजे, ही घोषणा करण्यापूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना विश्वासात घेतले नाही, अशी माहिती पुढे आली आहे.