आपल्या बॅगेवर लक्ष ठेवा, असे सांगत आपली बॅग अनोळखी व्यक्तीकडे देऊन क्ष-किरण विभागात बिनदिक्कत गेलेल्या एका महिलेची पर्स चोरीला गेली. विशेष म्हणजे या महिलेने पर्समध्ये एटीएम कार्ड आणि सोबत त्याचा कोड नंबर असलेली डायरीही ठेवल्याने चोरटय़ाने आरामात १५ हजार रुपये काढून पोबारा केला.
याबाबत माहिती देतांना जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत सुर्वे यांनी सांगितले की, वसई येथे राहणाऱ्या या महिलेची आई जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. गुरुवारी क्ष-किरण विभागात त्यांच्या आईला नेण्यात आले. त्यावेळी या महिलेने आपली बॅग बाहेर ठेवून बाहेर बसलेल्या अन्य महिलांना त्यावर लक्ष ठेवायला सांगितले. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा बॅग गायब झाली होती. त्या बॅगेत ८०० रुपये ओळखपत्र आणि बँकेचे एटीएम कार्डही होते. अज्ञात चोराने अवघ्या अध्र्या तासात त्या एटीएम कार्डमधून १५ हजार रुपये काढले. सावंत यांनी एटीएम कार्डचा कोड नंबरही त्याच बॅगेतील डायरीत लिहून ठेवला होता. त्यामुळे चोराला एटीएम कार्डसोबत आयता नंबरही मिळाल्याचे सुर्वे म्हणाले.
जे. जे. रुग्णालयात दररोज शेकडो लोकांची ये जा असते. अशा प्रकारे बाहेर बॅग ठेवून गेल्यास ती सुरक्षित राहील, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.