चर्चगेटसह आठ स्थानकांतील प्रवासीसंख्येत लक्षणीय घट

अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आदी उपनगरांत स्थलांतरित झालेली सरकारी व खासगी कार्यालये, उपनगरात झालेले रहिवाशांचे स्थलांतर इत्यादी कारणांमुळे चर्चगेट ते प्रभादेवीदरम्यानच्या आठ स्थानकांतील गर्दी ओसरली आहे. सहाजिकच या स्थानकांतून पश्चिम रेल्वेला मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे.

शहरी भागांत जागांच्या वाढलेल्या किमतीमुळे खासगी व सरकारी कार्यालये उपनगराकडे सरकली. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावसह अन्य काही भागांत जाण्याचे प्रमाण वाढते आहे. घरांच्या किमतीही परवडणाऱ्या नसल्याने आणि स्वस्तात मोठे घर मिळत असल्याने शहरी भागांतील छोटय़ा घरांमध्ये राहणाऱ्यांनी उपनगरातील मोठय़ा घरांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरी भागांतील रेल्वे स्थानकातील प्रवासी संख्येवरही परिणाम झाला असून प्रवासी संख्या कमी होत गेली. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते प्रभादेवीपर्यंतच्या स्थानकांतील दररोजची प्रवासी संख्या घटल्यामुळे उत्पन्नही गेल्या दोन वर्षांत कमी झाले आहे.

एकेकाळी गर्दीचे स्थानक असलेल्या चर्चगेट स्थानकातील गर्दी आता ओसरली आहे. चर्चगेट येथून २०१४-१५ मध्ये एक लाख २५ हजार २२९ प्रवासी प्रवास करत होते. २०१६-१७ मध्ये हीच संख्या एक लाख दोन हजार ५३६ वर आली. २०१७-१८ मध्ये ती आणखी म्हणजे ९६ हजार ३४६ वर उतरली. तर २०१६-१७ मध्ये सहा लाख ७२ हजार १६३ रुपयांपर्यंत असणारे रेल्वेचे उत्पन्नही आता सहा लाख ५८ हजार रुपयांवर आले आहे.प्रवासी संख्या व उत्पन्न घटण्यामध्ये चर्चगेटपाठोपाठ चर्नी रोड स्थानकाचा दुसरा नंबर लागतो. त्यानंतर मरिन लाइस, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी स्थानकांचा नंबर लागत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

‘राम मंदिर’चे प्रवासी वाढले

पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपूर्वी राम मंदिर स्थानक प्रवाशांच्या सेवेत आहे. २०१६-१७ मध्ये ५,२६६ असलेली प्रवासी संख्या २८ हजार ७७१ पर्यंत गेली आहे.उपनगरातील मालाड, कांदिवली, बोरिवली, नालासोपारा, विरार स्थानकांतील प्रवासी संख्या व उत्पन्न वाढते आहे. या भागांत रहिवासी संकुले मोठय़ा प्रमाणात उभी राहत आहेत. त्यामुळे येथे स्वस्तात मोठी घरे घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यातही बोरिवली व विरारमध्ये जास्त मागणी आहे.