ठाणे येथील स्थानक परिसरात राहणाऱ्या एका वृद्धेची हातोडय़ाने हत्या करून मारेकऱ्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला होता. या प्रकरणाचा अवघ्या चौवीस तासांच्या आत छडा लावत पोलिसांनी या हत्येप्रकरणी तिच्या मानस पुत्राला अटक केली आहे. तिच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तिच्या जावईच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे मानस पुत्राने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी जावईची चौकशी सुरू केली आहे.
अनिल श्रीपत रायबोले (३६), असे अटक करण्यात आलेल्या मानस पुत्राचे नाव असून तो लोकमान्यनगर भागात राहतो. ठाणे येथील स्थानक परिसरात असलेल्या अशोक हाऊसमध्ये माया अरविंद बहुलेकर (६३) राहत होत्या. त्यांच्यासोबत मुलगा वैभव, मुलगी सोनाली आणि जावई परेश ठक्कर राहत होते. अनिल हा त्यांचा मानस पुत्र असून तो नेहमी त्यांच्या घरी ये-जा करीत असे. घराच्या परिसरातील काही फेरीवाले त्यांच्या घरी सामानाच्या पिशव्या ठेवायचे, त्यातून त्यांना काही पैसे मिळत होते. बुधवारी वैभव हा काही कामानिमित्त तर सोनाली आणि परेश हे दोघे एका लग्नासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी माया या घरात एकटय़ाच असताना मारेकऱ्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर हातोडय़ाने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरून नेला. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांच्या पथकाने तपास सुरू केला. तसेच अवघ्या चौवीस तासांच्या आत तपास करून अनिलला अटक केली. या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची सविस्तर माहिती दिली. मानस पुत्र अनिल याने माया यांची हत्या करण्यासाठी वापरलेली हातोडी जप्त करण्यात आली आहे. मात्र, हत्येच्यावेळी चोरीस गेलेला सोन्याचा हार अद्याप मिळालेला नाही, असे रघुवंशी यांनी स्पष्ट केले.
माया यांची हत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, जावई परेशच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे अनिल सांगत सल्याने परेशची चौकशी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परेश हा काहीच काम करीत नव्हता.
त्यामुळे माया यांचे त्याच्यासोबत भांडण होत होते, यातूनच त्याने ही हत्या घडवून आणली, अशी माहिती अनिल ने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.