मुंबई ‘एनसीबी’कडील सहा गुन्हे विशेष पथकाकडे

एसआयटीचे प्रमुख संजय कुमार सिंग मुंबईत शनिवारी दाखल झाले असून एनसीबी-मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना  हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचा (एनसीबी) मुंबई विभाग तपास करीत असलेली  कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणासह एकूण सहा प्रकरणे शुक्रवारी विशेष पथकाकडे (एसआयटी) पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आली. एसआयटीचे प्रमुख संजय कुमार सिंग मुंबईत शनिवारी दाखल झाले असून एनसीबी-मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना  हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र वानखेडे यांचे तपासात सहकार्य घेण्यात येणार असल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले आहे.

मुंबई विभागीय पथकाने २ ऑक्टोबर रोजी छापा टाकून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह एकूण २० जणांना अटक केली. त्यातील १३ जणांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. एनसीबीच्या या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करून राज्यातील नेत्यांकडून आरोपांचे सत्र सुरू झाले.

एनसीबीच्या पाच सदस्यीय समितीने मुंबईत येऊन याप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली, तसेच प्राथमिक तपास करत समीर वानखेडे यांच्यासह तीन अधिकारी आणि अन्य पाच जणांचे जबाब नोंदवले. त्यानंतर एनसीबी मुख्यालयाने विशेष पथक (एसआयटी) स्थापन करून आर्यन खान प्रकरणासह समीर खान प्रकरण, अरमान कोहली प्रकरण, मुंब्रा एमडी प्रकरण, जोगेश्वरी चरस गुन्हा, डोंगरी एमडी प्रकरण तपासासाठी एसआयटीकडे वर्ग केले आहेत.

देश आणि विदेशात या गुन्ह्यांची व्याप्ती असल्याने हे सहा गुन्हे विशेष पथकाकडे देण्यात आल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक संजयकुमार सिंग यांनी स्पष्ट केले. तर, प्रशासकीय कारणांमुळे हे गुन्हे विशेष पथकाकडे वर्ग करण्यात आल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितले. 

 हे गुन्हे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपासासाठी देण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानुसार हे गुन्हे तपासासाठी विशेष पथकाकडे देण्यात आले आहेत, असे एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.

आरोपांमुळे संभ्रम

एनसीबीच्या कारवाईच्या वेळी उपस्थित असलेल्या किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्यावर सुरुवातीला आरोप झाले. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने धक्कादायक खुलासे करत याप्रकरणात आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर मात्र एनसीबीच्या महासंचालकांनी याची गांभीर्याने दखल घेत पाच सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली. याच दरम्यान, एनसीबीच्या एका अधिकाऱ्याचे २६ गुन्ह्यांबाबत प्रश्न उपस्थित करणारे पत्र समोर आले.

ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे एनसीबीविरोधात तक्रार…एनसीबीने अटक केलेला ब्रिटनचा नागरीक करन सजनानी याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पत्र लिहून एनसीबीने आपल्याला चुकीच्या प्रकरणात अडवल्याचा दावा केला आहे. त्याशिवाय सुशांत सिंग राजपुत प्रकरणानंतरही एनसीबीने चुकीचा गुन्हा नोंदवून माझ्याकडून २०० किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आल्याचे दाखवले असे नमूद करून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी सजनानीने केली आहे.  यामुळे आपल्या प्रतिमेचे हनन  झाले आहे. त्याबद्दल माफी मिळावी, अशी मागणीही त्याने केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Six crimes mumbai ncb special squad ysh

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या