‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर ‘एनएसई’चे प्रमुख विक्रम लिमये यांची ग्वाही

आपल्याकडे उद्योगऊर्मी मोठय़ा प्रमाणात आहे; परंतु उद्योजकाला हात धरून उभे राहण्यास मदतकारक ठरेल, अशा व्यवस्थात्मक रचनेची दुर्दैवाने उणीव आहे. सूक्ष्म व लघुउद्योगांना भक्कम पायावर उभे करण्यासाठी मदत आणि पालकत्वासाठी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’ची नेतृत्वदायी भूमिका असेल, अशी ठोस ग्वाही देशातील या सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी दिली.

सोमवारी ‘लोकसत्ता’कडून लघुउद्योगांच्या क्षमता व आव्हानाचा वेध घेणाऱ्या ‘बदलता महाराष्ट्र’ परिसंवादाच्या उद्घाटनानिमित्त ते बोलत होते. ‘केसरी’ प्रस्तुत व ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ व ‘एनकेजीएसबी बँक’ सहप्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता : बदलता महाराष्ट्र’ परिसंवादातून लघू व मध्यम उद्योगाच्या सक्षमीकरणासीठी पाठपुरावा केला जाणार आहे. या दोन दिवसांच्या परिसंवादाची सुरुवात सोमवारी सकाळी विक्रम लिमये यांच्या उद्घाटकीय भाषणाने झाली.

लघू व मध्यम उद्योग हे अस्सल उद्यमशील बाण्याचे प्रतिबिंब आहेत. अर्थव्यवस्थेच्या विकासात आणि शाश्वत रोजगारनिर्मितीत त्यांच्या योगदानाकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले आहे. आपल्या सर्वाच्या भल्यासाठी या उद्योगांना त्यांचे समर्पक स्थान मिळायला हवे, असे लिमये म्हणाले.  उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘मोठे तेच केवळ श्रेष्ठ ही सर्वसाधारण धारणा असून, लघुउद्योगांनी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत निभावलेल्या भूमिकेकडे आजवर दुर्लक्ष होत आले आहे,’ असे मत व्यक्त केले. लघुउद्योगांसाठी शब्दसेवा बरीच केली जाते, परंतु हात धरून त्यांना खंबीर पायावर उभे करण्याचे प्रयत्न खूपच अपुरे असल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले.

छोटय़ा उद्योजकांना भांडवल उभारण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसाय कक्षा रुंदावण्यासाठी ‘एनएसई’च्या भूमिकेचा उल्लेख लिमये यांनी आपल्या भाषणात केला. छोटय़ा उद्योगांसाठी ‘एनएसई इमर्ज’ हे विश्वासार्ह व्यासपीठ उभे राहिले आणि सध्या ७६ कंपन्यांनी त्यावर नोंदणीद्वारे ९५० कोटी रुपयांहून अधिक भांडवल उभारले आहे. यातून या उदयोन्मुख छोटय़ा कंपन्यांकडे गुंतवणूकदारही आस्थेने पाहत असल्याचे स्पष्ट होते, याकडे लिमये यांनी लक्ष वेधले. ‘एनएसई इमर्ज’वर नोंदणीसाठी येणारा खर्च अत्यल्प, तर आवश्यक गुंतवणूकदारांची ५० ही संख्या खूपच माफक असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तम व्यवस्थापन, सुशासन, तंत्रज्ञानाची कास आणि कुशल-व्यावसायिक मनुष्यबळ या आधारे लघुउद्योगांनी पाया मजबूत केल्यास त्यांना भांडवली गुंतवणूक मिळविणे अवघड नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

योगदानाची अपेक्षा

लघुउद्योगांना प्रोत्साहनाच्या सरकारच्या योजना आहेत आणि व्यक्तिगत स्तरावर बरेच व्यावसायिक सल्लागार कार्यरत आहेत; मात्र उद्योगाचा पाया रचूून तो फळण्या-फुलण्यास प्रत्येक पातळीवर मदत करेल, अशा व्यवस्थेची आपल्याकडे वानवा आहे, अशी खंत लिमये यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. लघुउद्योगाच्या घडणीसाठी सल्ला-मार्गदर्शन आणि पालकत्वाची भूमिका एनएसईकडून सहर्षपणे बजावली जाईल, असे नमूद करून त्यांनी वेगवेगळ्या उद्योग संघटनांनीही या संबंधाने योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.

आजची सत्रे

प्रोत्साहनपूरक योजना व उद्योगानुकुलता

  • सहभाग : संजय सेठी (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी), डॉ. प्रदिप बावडेकर (व्यवस्थापकीय संचालक, मिटकॉन), समीर जोशी (मुख्य कार्यकारी अधिकारी, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ुट)

नियमावली : बंधन की व्यवसाय सुलभता

  • सहभाग : सचिन म्हात्रे (उपाध्यक्ष, विदेश व्यापार समिती – टिसा), मोहन गुरनानी (अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र), रवींद्र सोनावणे (अध्यक्ष, लघुउद्योग भारती-महा.)

छोटे ते मोठे उद्योग – वाढीचे संक्रमण

  • सहभाग : प्रमोद चौधरी (अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर), शंतनू भडकमकर (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स)

विशेष मार्गदर्शन : दीपक कपूर मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

परिषद समारोप : प्रमुख पाहुणे वाय. एम. देवस्थळी, माजी अध्यक्ष, एल अँड टी फायनान्शिअल होल्डिंग्ज.