बॉम्बे इन्टेलिजन्स फोर्स या सुरक्षा एजन्सीच्या मालकचा मुलगा संतोष सिंग याला १७ लाखांच्या घडय़ाळाच्या तस्करी प्रकरणी विमानतळ गुप्तचर विभागाने अटक केली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.लंडनहून शुक्रवारी आल्यानंतर त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्याने एका घडय़ाळाचे सीमाशुल्क भरले नसल्याचे निदर्शनास आले. सिंग याने इतर सामानावर सीमा शुल्क भरले होते. फक्त घडाळ्यावर सीमा शुल्क नव्हते, असे हवाई गुप्तचर विभागाचे उपायुक्त समीर वानखेडे यांनी सांगितले. त्याला दंड आकारून जामीनावर सुटका केल्याचे वानखेडे यांनी सांगितले. संतोष सिंग यांच्याशी संपर्क साधला असता मी ते घडय़ाळ हातात घातले होते. त्यावर सीमा शुल्क भरावे लागते याची मला कल्पना नव्हती, असे त्यांनी सांगितले. संतोष सिंग हा उत्तर भारतीय विकास परिषदेचे अध्यक्ष आर. एन. सिंग यांचा मुलगा आहे.