सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी प्राकृतात लिहिल्या गेलेल्या ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथात त्या काळातील समाजजीवन आणि मानवी भाव-भावनांचे यथार्थ चित्रण दिसून येते, असे प्रतिपादन अरुंधती वर्तक यांनी मंगळवारी केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ज्या ग्रंथाचा बहुमोल आधार लाभणार आहे, त्या ग्रंथावर भाष्य करण्यासाठी वर्तक यांना मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येस आमंत्रित करण्यात आले होते.
‘एशियाटिक सोसायटी’तर्फे अरुंधती वर्तक यांचे ‘गाथा सप्तशतीमधील सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
‘गाथा सप्तशती’ची निर्मिती सातवाहन काळातील राजा हाल याने केली. या ग्रंथातील काही रचना स्वत: हाल यानेच लिहिल्या असून यात पुढे अन्य कवींच्या काही रचनांची भर पडली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील कवींनी रचलेल्या रचना हाल यांनी गोळा केल्या आणि त्यातून हा ग्रंथ तयार झाला, असे वर्तक म्हणाल्या. या ग्रंथात त्या काळातील समाजजीवनाबरोबरच सामाजिक व्यवहार, निसर्ग, छोटी खेडी, शेती, जंगल, नद्या, विहीरी, विंध्य पर्वत, गोदावरी नदी, स्त्री-पुरुष यांच्यातील प्रेम, तसेच शृंगार, हास्य, करूण आदी रसांचाही समावेश असल्याचे त्या म्हणाल्या.
त्या काळातील लेखक आणि कवी यांच्यावरही ‘गाथा सप्तशती’चा व त्यातील भाषेचा पडलेला प्रभाव, दोन हजार वर्षांंपूर्वी वापरण्यात येणारे मराठी प्राकृत आणि आजच्या काळात मराठी भाषेतील काही शब्द यांची उदाहरणेही त्यांनी या वेळी दिली. अथर्ववेद, ऋग्वेद आदी प्राचीन भारतीय ग्रंथांतील वैदिक ऋचा दैवी असल्याचे मानले जाते तर ‘गाथा सप्तशती’तील रचना मानवीय आहेत, असेही वर्तक यांनी सांगितले. डॉ. अरुण टिकेकर यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम मात्र संपूर्णपणे इंग्रजीतून!!
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त मराठी भाषेचा जागर करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. वर्तक यांच्या व्याख्यानाचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता. एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात तसा उल्लेखही केला. मात्र वर्तक यांचे व्याख्यान आणि डॉ. टिकेकर यांचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन तसेच व्याख्यानानंतर झालेली प्रश्नोत्तरेही इंग्रजीमधूनच झाली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2013 रोजी प्रकाशित
‘गाथा सप्तशती’त समाजजीवनाचेच चित्रण!
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी प्राकृतात लिहिल्या गेलेल्या ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथात त्या काळातील समाजजीवन आणि मानवी भाव-भावनांचे यथार्थ चित्रण दिसून येते, असे प्रतिपादन अरुंधती वर्तक यांनी मंगळवारी केले.

First published on: 03-03-2013 at 03:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social life picture in gatha saptashati