पित्याच्या हत्येप्रकरणी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. आरोपीविरुद्ध ठोस पुरावे आले नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली व गेल्या आठ वर्षांपासून कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले.
आरोपी सुभाष जाधव यानेच वडील सुखदेव यांची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे पोलीस सिद्ध करू शकलेले नाहीत, असे स्पष्ट करीत न्यायालयाने सुभाषची जन्मठेप रद्द करीत त्याच्या सुटकेचे आदेश दिले. न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामानी आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
पोलिसांच्या दाव्यानुसार, २६ एप्रिल २००४ रोजी सुभाषचे दारूच्या नशेत वडील व भावाशी भांडण झाले. कुटुंबातील अन्य सदस्यांनी समजूत काढल्यानंतर सुभाषा घरातून निघून गेला. काही वेळाने गोपाळला शेजाऱ्यांनी फोन करून लगेचच घराबाहेर येण्यास सांगितले. गोपाळ घराबाहेर आला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वडील, तर सुभाष काही अंतरावर उभा असलेला त्याने पाहिला. त्यानंतर गोपाळने केलेल्या तक्रारीनंतर सुभाषला वडिलांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. सप्टेंबर २००५ मध्ये मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्याला हत्येप्रकरणी दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परंतु आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा करीत त्याच्या विरोधात सुभाषने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
सुभाषच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड्. अरफान सैत यांनी सुभाषला वडिलांची हत्या करताना कोणीच पाहिलेले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. केवळ संशयावरून त्याला अटक केल्याचा दावाही सैत यांनी केला. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
पित्याच्या हत्येप्रकरणी मुलाची आठ वर्षांनी सुटका
पित्याच्या हत्येप्रकरणी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. आरोपीविरुद्ध ठोस पुरावे आले नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली व गेल्या आठ वर्षांपासून कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले.
First published on: 15-06-2013 at 02:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son release after eight year arrested for father murder