काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये अन्य पक्ष पद्धतशीरपणे बस्तान बसवित असल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी जयपूरच्या चिंतन शिबिरात व्यक्त केलेली चिंता महाराष्ट्रासाठी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये अन्य पक्षांनी तर काँग्रेसला आव्हान दिलेच आहे; पण पारंपरिक मतदारही काँग्रेसपासून दूर जाऊ लागला आहे.
महाराष्ट्र हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विधानसभेच्या २८८ पैकी २०० पेक्षा जास्त आमदार काँग्रेसचे निवडून यायचे. राज्यात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सरासरी ४० ते ४५ टक्के असायची. मात्र, गेल्या २० वर्षांमध्ये काँग्रेसच्या या वर्चस्वाला ओहोटी लागली. काँग्रेसची मतांची टक्केवारी २३ टक्क्य़ांवर आली. १९९० नंतर राज्यात काँग्रेसला विधानसभेत तिहेरी आकडा गाठणे शक्य झालेले नाही.
दलित, मुस्लिम, आदिवासी हे काँग्रेसचे पांरपरिक मतदार. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे सारेच पारंपरिक मतदार काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले नाहीत. मुस्लिमांना समाजवादी पार्टी किंवा स्थानिक आघाडय़ांचे आकर्षण वाढले. अगदी अलीकडेच झालेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत हैदराबादच्या ‘मजसिल -ए-मुस्लिम’चे ११ नगरसेवक मुस्लिमबहुल प्रभागांमधून निवडून आले. गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही मुस्लिमांची मते समाजवादी पार्टीच्या परडय़ात मोठय़ा प्रमाणावर पडल्याचे स्पष्ट झाले. भिवंडीमध्ये दोन्ही आमदार समाजवादी पार्टीचे निवडून आले होते. मालेगावमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. एकूणच मुस्लिमबहुल या एकेकाळी काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात काँग्रेसची पीछेहाट झाली. आदिवासी भागात भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिले. आदिवासींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून भाजप, शिवसेना वा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला किंवा इंदिरा गांधी वा सोनिया गांधी नेहमी प्रचाराचा प्रारंभ करीत त्या नंदुरबार, नवापूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व घटले. नवापूरमध्ये सुरुपसिंह नाईकांनाही पराभव स्वीकारावा लागला. मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात भाजपचा आमदार निवडून येऊ लागला. इतर मागासवर्गीय समाजाने शिवसेनेला साथ दिली. १९९५ मध्ये शिवसेनेच्या विजयात ओबीसी समाजाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला होता. मराठा समाज हा पूर्वी काँग्रेसबरोबर होता. या समाजाने शरद पवार यांना साथ दिली. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत राज्यात इतरत्र काँग्रेसचा धुव्वा उडाला असताना विदर्भाने मात्र काँग्रेसला साथ दिली होती. त्या विदर्भातही भाजपने काँग्रेसला टक्कर दिली.  काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांत शिवसेना, भाजप किंवा समाजवादी पार्टीने काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात किंवा ‘व्होटबँके’त चंचूप्रवेश करणे शक्य झालेले नाही.