उपनगरी गाडय़ांमध्ये महिलांना अधिकाधिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न आता मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलीस करत आहेत. दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेनंतर आता मुंबईत महिलांना कोणत्याही वेळी सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रेल्वेने खास ‘माझा जीव वाचवा’ ही योजना तयार केली आहे. महिलांच्या डब्यात लवकरच एक बटन बसविण्यात येणार असून ते पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडलेले असेल. यामुळे संबंधित महिलेस तात्काळ मदत उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्यासमोर दोन पोलीस तैनात करणे, रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यातून पोलीस ठेवणे आदी सुरक्षा उपाय रेल्वे पोलिसांनी केले आहेत. तरीही अनेकदा महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात. अलीकडेच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रभातकुमार यांना महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी पोलीस तैनात करण्याची सूचना केली होती. मात्र इतक्या मोठय़ा संख्येने पोलीस तैनात करणे शक्य नसल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. ठाण्याच्या किंवा बोरिवलीच्या पुढे एकटय़ा दुकटय़ा महिला गाडीतून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करतात. किंबहुना महिलांच्या डब्यापेक्षा पुरुषांच्या किंवा गर्दी असलेल्या डब्यातून या महिला प्रवास करणे पसंत करतात. महिलांना अधिक सुरक्षित वाटावे आणि त्यांना बिनधास्तपणे प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे पोलिसांच्या मदतीने एक योजना आखली आहे. महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीसह एक बटन बसविण्यात येणार आहे. त्याचे नियंत्रण थेट नियंत्रण कक्षाकडे असेल. काही अनुचित प्रकार घडला तर हे बटन दाबायचे. तात्काळ नियंत्रण कक्षामध्ये या डब्यातील सर्व हालचाली दिसू लागतील. गाडी कुठे आहे याची माहिती नियंत्रण कक्षामध्ये मिळेल आणि तात्काळ नजीकच्या स्थानकावरून पोलिसांची मदत त्या डब्यामध्ये पोहोचवली जाईल.
सध्या या योजनेची चाचणी सुरू असल्याचे रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले. उपनगरी गाडीतील प्रत्येक प्रवाशावर नजर ठेवणे शक्य नाही, असे सांगून ते म्हणाले की, उपनगरी गाडीमध्ये प्रत्येक डब्यात एक सीसीटीव्ही बसविण्यात येईल.
१५ जानेवारीला प्रायोगिक तत्त्वावर एका डब्यात असा सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून त्याची चाचणी घेण्यात येईल. डेन्मार्क कंपनीने हा सीसीटीव्ही तयार केला असून त्या फायदा नेमका किती मिळतो याचीही तपासणी करण्यात येईल आणि नंतरच सर्व गाडय़ांमध्ये असे कॅमेरे लावण्यात येतील, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2013 रोजी प्रकाशित
महिलांच्या मदतीसाठी लवकरच ‘माझा जीव वाचवा’ योजना
उपनगरी गाडय़ांमध्ये महिलांना अधिकाधिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न आता मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलीस करत आहेत. दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेनंतर आता मुंबईत महिलांना कोणत्याही वेळी सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रेल्वेने खास ‘माझा जीव वाचवा’ ही योजना तयार केली आहे. महिलांच्या डब्यात लवकरच एक बटन बसविण्यात येणार असून ते पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडलेले असेल.
First published on: 04-01-2013 at 04:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon save woman life programme will be implemented in suburban railway