मुंबईतील ८९ टक्के ठिकाणी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन

सणउत्सवांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यानिमित्ताने दरवर्षी होणारे नियमांचे उल्लंघन यावर चर्चा झडत असली तरी, मुंबईकरांना वर्षभर दिवसरात्र ध्वनिप्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई महापालिकेच्या पर्यावरणीय अहवालानुसार ध्वनिची मोजणी होणाऱ्या १२०० हून अधिक ठिकाणांपैकी अवघ्या सात ठिकाणी आवाज मर्यादेत असतो. शहरातील ८९ टक्के ठिकाणी दिवसभराचा आवाज ७० ते ९० डेसिबलपर्यंत जात असून रात्रीही आवाजाची पातळी कमी होत नाही.

२०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि नागरी कृती समिती यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मुंबईत १२०० ठिकाणी ध्वनीमापन यंत्रे लावण्यात आली. ध्वनीमापनासाठी नियोजित ठिकाणांचे न्यायालय, शाळा, धार्मिक स्थळे, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट कार्यालये, औद्योगिक विभाग, बाजार, रेल्वे स्थानके, विमानतळ असे विभाग करण्यात आले. कामाच्या आणि सुटीच्या दिवशी तसेच दिवसा (सकाळी ६ ते रात्री १०) आणि रात्री अशा प्रकारात ध्वनीमापन नोंदले गेले. केंद्रीय ध्वनी नियमांनुसार निवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्री ५० डेसिबलची मर्यादा आहे. महापालिकेने घेतलेल्या या नोंदीनुसार कामकाजाच्या दिवशी १२०० पैकी फक्त ७ ठिकाणी आवाजाची पातळी ५० ते ६० डेसिबलमध्ये आहे. सर्वाधिक २६३१ म्हणजे ५५ टक्के ठिकाणी दिवसाचा आवाज ७० ते ८० डेसिबलपर्यंत जात असून १६३० म्हणजे ३४ टक्के ठिकाणी दिवसाचा आवाज ८० ते ९० डेसिबलपर्यंत पोहोचत आहे. रात्रीसुद्धा आवाजाची पातळी ७० ते ९० डेसिबलपर्यंतच राहत आहे.

हवाही प्रदूषितच

  • दोन वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षी हवेच्या प्रतवारीत सुधारणा झाली असली तरी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या मानकांनुसार अद्याप हवेतील प्रदूषणाची पातळी जास्त आहे.
  • सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण २०१६-१७ मध्ये घसरल्याचे आढळून आले आहे.
  • अंधेरी आणि भांडुप या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. अंधेरी येथे २०१४-१५ मध्ये ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते. ते २०१५-१६ मध्ये ६३ मायक्रोग्रॅमवर पोहोचले आणि आता २०१६-१७ मध्ये ते ७३ मायक्रोग्रॅमवर पोहोचले आहे.

.. म्हणून उष्णता जास्त

प्रदूषण नियंत्रण मानकांनुसार हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.ही मर्यादा ओलांडल्यामुळे मुंबईतील उष्णता वाढू लागली आहे. वातावरणातील नायट्रोजन डासऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि अमोनियाचे प्रमाण वाढल्यास पर्यावरणाला, तसेच मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईच्या वातावरणातील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असतानाच सल्फर डायऑक्साईड आणि अमोनियाचे प्रमाण मात्र सातत्याने कमी होत आहे.