चित्रकार सय्यद हैदर रझा यांचा चित्रप्रवास हा ‘नव्या भारतीयते’च्या शोधातून ‘प्राचीन भारतीयते’कडे वळलेला.. आणि अखेरीस भारतीयता स्वतमध्येच आहे या जाणिवेवर स्थिरावलेला, असा आहे. रझा आता कालवश झाले असले, तरी या प्रवासाचे टप्पे ठरलेली चित्रे आपल्यासोबत यापुढेही असणार आहेत.

रझा मध्य प्रदेशातील भबरिया येथे जन्मले आणि वडील सुस्थितीत (वनखात्यात अधिकारी) असल्याने मुंबईत कलाशिक्षण घेण्यासाठी येऊ शकले. मुंबईच्या लायन गेटसमोरील कामा इन्स्टिटय़ूटच्या सभागृहातील समूह-प्रदर्शनात १९४३ सालीच रझांची चमक कलासमीक्षक रूडी व्हॉन लायडन यांनी हेरली होती. लायडन, चित्रकार वॉल्टर लँगहॅमर आणि कलासंग्राहक इमॅन्युएल श्लेसिंजर यांच्या प्रोत्साहनातून ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ हा समूह (रझा, फ्रान्सिस न्यूटन सूझा, मकबूल फिदा हुसेन, कृष्णाजी हौलाजी आरा, सदानंद बाकरे व हरि अंबादास गाडे) स्थापन होऊन या ‘ग्रूप’चे पहिले प्रदर्शन १९४९ साली भरले. परंतु याआधीची दोन वर्षे रझांसाठी वादळी ठरली होती. १९४७ व ४८ साली आई-वडिलांचे निधन झाले. सारी भावंडे पाकिस्तानात गेली. आता रझा भारतात- मुंबईत एकटे उरले. अन्य प्रोग्रेसिव्ह चित्रकारांसह, १९४९ मध्येच शेख अब्दुल्लांच्या निमंत्रणावरून ते काश्मीर दौऱ्यावर गेले. मात्र तेथे फ्रेंच फोटोग्राफर आंरी कार्तिए ब्रेसाँ यांची भेट झाली आणि त्यांनी दिलेला ‘फ्रान्सला ये’ हा सल्ला रझांनी मानला! मग तेथेच लग्न करून, दक्षिण फ्रान्सच्या एका खेडय़ात त्यांनी संसार थाटला. त्यांना अपत्य नसले, तरी पुढल्या काळात- १९९० नंतर-  भारतातील (विशेषत: मध्य प्रदेशातील) अनेक होतकरू तरुण चित्रकार-चित्रकर्तीना त्यांनी स्वतच्या स्टुडिओत नेऊन, स्वतच्या कलेची संथा पुढील पिढय़ांना दिली. रझा यांनी भारतात दरवर्षी परतण्याचा नेम सुरू ठेवला. तो अगदी २०१० मध्ये ते भारतात कायमचे परतले, तोवर टिकला. साधारण दर हिवाळय़ात ते येत. हा काळ भारतीय कला-संस्कृतीविश्वात बहराचाच असतो, त्या अनेक कार्यक्रमांत रझा सहभागी होत. सांस्कृतिक खात्यातील अधिकारी आणि कवी अशोक वाजपेयी यांच्याशी त्यांचे विशेष मैत्र झाले. ते इतके टिकले की पुढे, रझांनी दिल्लीवासी व्हावे यासाठी वाजपेयींनी विशेष प्रयत्न केले.

रझा कॅनव्हासवर वा कागदावर ज्या आवेगाने रंग लावत, तो अगदी १९४६ पासूनच्या त्यांच्या चित्रांमध्ये दिसतो. या आवेगी रंगकामात, उजळ आणि परस्परविरोधी रंग एकमेकांत कधीकधी मिसळलेले दिसत. पिवळा, हिरवा, लाल असे रंग रझा सहज वापरत.. पण हे सारे १९५० पर्यंत फारतर निसर्गदृश्ये चितारण्यापुरते मर्यादित होते. पुढे हीच निसर्गदृश्ये अमूर्त होऊ लागली. फ्रान्समधील ‘ला टेरे’ (पम्ृथ्वी, जमीन) आणि भारतात येऊन केलेली ‘सौराष्ट्र’, ‘राजस्थान’, ‘माथेरान’ ही १९७० च्या दशकातील चित्रे या अमूर्त निसर्गदृश्यांची उत्तम उदाहरणे होत. यापैकी ‘माथेरान’ या चित्राच्या खालच्या भागाच्या मध्यावर एक घोडय़ाचा आकारही दिसतो, पण तो अगदी अस्फुट. हे सारे, आधुनिक कलेत भारतीयता आणण्याच्या रझा यांच्या प्रयत्नाचा भाग म्हणावे लागेल. निसर्ग आणि रंगही भारताचे, पण आवेगाने अमूर्तीकरणापर्यंत जाण्याची रीत ‘एक्स्प्रेशनिझम’ या आधुनिक कलाप्रवाहाशी मिळतीजुळती!

मात्र यानंतरचा टप्पा रझा यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. ‘बिंदू’ या चित्रमालिकेपासून, भारतीय आध्यात्मिक संदर्भ आणि त्यांमधली प्रतीके रझांच्या चित्रांत आली. मग नादबिंदू, जलबिंदू, आरंभबिंदू अशा अनेक चित्रमालिका झाल्या. त्यांत पंचमहाभूतांची प्रतीके आली. प्राचीन तंत्रकलेतले त्रिकोन-चौकोन यांचे प्रतीकात्मक अर्थही अनुस्यूत झाले. रंगकामाचे एक आगळेच वैशिष्टय़ या काळात रझा यांनी निर्माण केले व जपले, ते म्हणजे रंगांची कडा मुद्दाम खडबडीत (डेकल एज्ड) ठेवण्याचे. लघुचित्रांच्या अगदी कडेचा भाग हा असाच असतो, असे रझा म्हणत. कधी कधी एखाद्या चित्राच्या एखाद्या भागात कोणतेही प्रतीक रझांना अभिप्रेत नसले, तरी ‘डिझाइन’ म्हणून चित्राच्या अन्य तपशिलांशी मिळतेजुळते आकार त्या भागात आणून चित्राला एक संपूर्ण संपन्नत्व देण्याची युक्ती त्यांनी आत्मसात केली.

प्राचीनतेतून आधुनिकतेचा शोध घेण्याचा हा टप्पा रझांनी दीर्घकाळ लांबवला, त्याचे एक कारण म्हणजे कलाबाजाराची मागणी याच चित्रांना वाढत होती. रझादेखील ‘ब्रँड’ बनण्यात जणू धन्यता मानताहेत, असे या काळातील (नव्वदोत्तरी) चित्रसमीक्षकांचे मत होते. मात्र या टप्प्यातून अलीकडेच रझा सुटू लागले होते..

.. भारतात परतल्यावर, महात्मा गांधी यांच्यावरील ‘परिक्रमा’ ही चित्रमालिका रझांनी रंगवायला घेतली. इथे रझा यांची ‘स्वतमधली भारतीयता’ दिसते. ही चित्रे आकार आणि रंग यांचा कमीत कमी वापर करणारी आहेत. तरीही गांधीजींच्या साधेपणाचा प्रत्यय त्यांतून येतो. या चित्रांचे प्रदर्शन दिल्लीच्या ‘वढेरा आर्ट गॅलरी’ने २०१४ मध्ये भरविले होते.  तरीही, रझा लक्षात राहतील ते त्यांच्या संकल्पचित्रवजा- पण भारतीय प्रतीकांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या – चित्रांसाठी! हे प्रतीकांचे पुनरुज्जीवन रझांच्या आधी के. सी. एस. पणिक्कर, गुलाम रसूल संतोष यांनी केले होते, पण रझांनी ते अधिक सुलभ, अधिक ‘आधुनिक’ केले. हे रझांचे कार्य ऐतिहासिकच आहे.