नववर्षांचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी मोठय़ा संख्येने लोक घराबाहेर पडतात. या वेळी उत्साहाच्या आणि नशेच्या भरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
तळीरामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पब्ज आणि डिस्कोथेक मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. अपघाताचे प्रकार रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सूचनाफलक लावले आहेत. नेहमीच्या तुलनेत त्या दिवशी तिपटीने नाकाबंदी ठेवण्यात येईल, असे अपर पोलीस आयुक्त ब्रिजेश सिंग यांनी सांगितले. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरांव्यतिरिक्त खास हँडी कॅमने प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गाडीच्या टपावर बसणे, तसेच गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसवणे किंवा मोठय़ाने संगीत लावणे अशा गोष्टींवर पोलिसांची नजर असेल. अशांवर दुसऱ्या दिवशी कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही सिंग यांनी सांगितले.