मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत गुरुवारी विशेष न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ३१ जुलैला राऊत यांना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

राऊत यांना न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी गुरुवारी संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत राऊतांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले.

पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या सुमारे एक हजार ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडी तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यावर शोधमोहीम राबवली. तब्बल साडेनऊ तासांच्या कारवाईनंतर ईडीच्या पथकाने राऊत यांना ताब्यात घेऊन ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणले. येथे रात्री एक वाजेपर्यंत चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांना सोमवारी विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊत यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विशेष पीएलएमए न्यायालयासमोर बुधवारी हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

ईडीचा युक्तिवाद काय?

‘ईडी’च्यावतीने हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला. गैरव्यवहारातील पैसा प्रवीण राऊत यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांना मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम देण्यात आली आहे. त्यातूनच त्यांनी रोख रक्कम देऊन मालमत्ता खरेदी केल्या. याबाबत संजय राऊत यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी रोखीने व्यवहार केले नसल्याचे सांगितले. मात्र तपास यंत्रणेला या रोख रकमेच्या जमीन व्यवहारांबाबत माहिती मिळाली आहे. राऊत यांनी जमीन खरेदीसाठी ज्यांच्याशी करार केले त्यांना समन्स बजावून ५ आणि ६ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीच्या तपासानुसार गैरव्यहारातील एक कोटी सहा लाख रुपये संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे.

राऊत यांच्याशी संबंधित अनेक बॅंक खात्यांचा तपास करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी वर्षां राऊत यांच्या बॅंक खात्यात मोठय़ा रकमा आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत संजय राऊत यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संबंधित बॅंकांशी पत्रव्यवहार करून खात्यांचे अन्य तपशील मागविण्यात आले आहेत. बॅंकाकडून ०६ ऑगस्टला हे दस्तऐवज मिळण्याची शक्यता आहे. वर्षां राऊत यांच्या खात्यात एकूण एक कोटी आठ लाख रुपये आल्याचे दिसून येते. एक हजार ३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहाराच्या तपासाची व्याप्ती मोठी असून तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. संजय राऊत यांच्याकडे चौकशी करण्यासाठी मिळालेला वेळ पुरेसा नाही. राऊत चौकशीला सहकार्य करत नाहीत. त्यांचा गुन्ह्यातील सहभाग तपासून पुढील तपास करायचा आहे. त्यामुळेच राऊत यांच्या वाढीव कोठडीची आवश्यकता असून त्यांच्या कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केली.

राऊत यांच्या वकिलांचे म्हणणे..

अ‍ॅड. मनोज मोहिते यांनी संजय राऊत यांच्यातर्फे युक्तिवाद केला. ईडीच्या वाढीव कोठडीच्या मागणीला संजय राऊत त्यांनी विरोध केला. ईडीच्या तपासात नवीन काहीही समोर आले नाही. ईडीने यापूर्वीही असे दावे केले होते, असे मोहिते यांनी न्यायालयाला सांगितले.

कोठडीत एकच पंखा

ईडी कोठडीत राऊत यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यांना इतर अडचणी नाहीत. पण जेथे ठेवण्यात आले आहे तेथे एकच पंखा असल्याचे राऊतांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यावर ही गंभीर बाब आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ईडीकडे उत्तर मागितले. ईडीने संजय राऊत यांना एसीमध्ये ठेवले असल्याचा दावा केला. त्यावर न्यायालयाने राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी फक्त एक पंखा आहे आणि मी एसी वापरत नाही कारण मला श्वास घ्यायला त्रास होतो, असे नमूद केले. त्यावर न्यायालयाने दुसऱ्या खोलीबाबत ईडीकडे विचारणा केली आहे.