क्रीडा भवनमधील खेळाच्या साधनांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका महानगरपालिकेच्या चार कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. क्रीडा भवनात घेण्यात आलेल्या साधनांच्या भ्रष्टाचारासंबंधी अनेक महिने प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यासंबंधी विभाग अधिकाऱ्याने चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सोपवला आहे.
माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी सुधार समितीत यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. खेळाडूंसाठी विकत घेण्यात येणाऱ्या साधनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर सुधार  समितीने वॉर्ड अधिकारी सुनिल धामने यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे काम सोपवले होते. या चौकशीत पालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालिकेचे मुख्य लिपीक व क्रीडाभवनाचे मुख्य सचिव श्रीकांत कामतेकर, कोषाध्यक्ष मोहन पाटील, सचिव विजय पोखरकर व क्रिकेट सचिव अविनाश दुधाने यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून त्यांसंबंधीचा अहवाल आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे देण्यात आला.