तब्बल ३० कोटींचा सल्ला; सार्वजनिक-खासगी सहभागातून प्रकल्प
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर आधुनिक सुविधांनी समृद्ध बस तळ उभारून एसटीचा दर्जा सुधारण्याची पूर्वतयारी महामंडळाने सुरू केली आहे. राज्यभरातील तब्बल १३ ठिकाणी असे आधुनिक बस तळ उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक-खासगी सहभागातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका खासगी सल्लागार संस्थेची यात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांच्या आखणीसाठी तब्बल ३० कोटींहून अधिकची रक्कम सल्लागार संस्थेला दिली जाणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या राज्यभरातील एसटीची एकूण ५८८ बस स्थानके, २५२ बस आगारे आहेत. यातून रोज १८ हजारांहून अधिक बस गाडय़ा चालवल्या जात असून या गाडय़ांनी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र असे असूनही जुनाट बस स्थानके आणि आगारांमुळे एसटीची प्रतिमा मलिन होत आहे. सर्वसामान्यांच्या मनातील हे चित्र बदलण्यासाठी महामंडळाकडून अशा प्रकारची ‘आधुनिक’ मार्ग शोधले जात आहेत. यात राज्यभरातील एकूण १३ ठिकाणी आधुनिक बस तळ उभारण्यात येणार आहेत. यात पनवेल, बोरिवली-नॅन्सी कॉलनी, पुणे-शिवाजीनगर, सांगली (माधवनगरसह), सोलापूर पुणे नाका, कोल्हापूर संभाजीनगर, नाशिक महामार्ग, धुळे मध्यवर्ती, जळगाव, औरंगाबाद मध्यवर्ती, नांदेड, आकोला आणि नागपूर या ठिकाणांचा समावेश आहे. मनोरंजनासाठी वाय-फाय, दूरचित्रवाणी संच आदींची सोय उपलब्ध केली जाणार असण्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्याकडून वर्तवली आहे. यासाठी खासगी सल्लागार संस्थेची मदत घेतली जाणार आहे. यात सल्लागाराला निविदोत्तर कामात बस स्थानकांचे सविस्तर आराखडे तयार करणे, स्थानिक प्राधिकरणाकडील बांधकाम परवानगी प्राप्त करणे, व्यापारी संकुलाचा मास्टर आरखडा तयार करणे, आगार आस्थापनांच्या चालनासाठी नियोजन करणे, बांधकाम साहित्याच्या वेळोवेळी गुणवत्ता चाचण्या करणे, प्रकल्प पूर्णत्व व वापर परवाना प्रात्प करणे, आदी कामे पूर्ण करावी लागणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र यातील तांत्रिकबाबी पूर्ण झाल्यानंतरच याची अंमलबाजवणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* विमानतळाप्रमाणे प्रवासी आणि बस गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका, दिशादर्शक, पार्किंग, विश्रांतिगृह, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, गाडी कुठे आहे? किती वेळात येणार? याची माहिती स्क्रीनवर मिळेल.