मुंबई : कडक उन्हामुळे होणारी अंगाची काहिली, असह्य उकाडा आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारांची तमा न बाळगता राज्याच्या विविध भागांतील हजारो एसटी कर्मचारी आझाद मैदानात दाखल झाले. उच्च न्यायालयात मंगळवारी विलीनीकरणाबाबत होणाऱ्या सुनावणीची उत्सुकता आणि हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच विलीनीकरणाचा लाभ मिळेल अशा आशयाचा संदेश पसरल्याने सोमवारपासूनच संपकरी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानाकडे धाव घेतली. संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने पैसे उसनेवारी घेऊन घरखर्च चालवावा लागत आहे. मात्र तरीही मागे न हटता विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत.
मुंबई विभागाबरोबरच, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. यवतमाळ, सांगली, वर्धा, अकोला, उस्मानाबाद, औरंगाबाद, चंद्रपूर यासह एकूण ३२ विभागातून मोठय़ा प्रमाणात कर्मचारी सामानासह आझाद मैदानात दाखल झाले आहेत. प्रत्येक विभागातून आपल्या सहकाऱ्यांसह येताना कोणी रेल्वेने, तर कोणी खासगी गाडीने मुंबईत दाखल झाले. मैदानात आलेल्या कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचावासाठी छोटा मंडपही उभारण्यात आला आहे. मात्र तोही अपुरा पडत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना मैदानातील छोटय़ा झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागला. कडक उन्हात उभे राहून कर्मचारी विलीनीकरण आणि अन्य मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत होते. यात महिला कर्मचाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहकांची संख्या मोठी आहे. तसेच अन्य खात्यांतील कर्मचारीही संपात सहभागी आहेत. मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी एका टँकरची व्यवस्था केली आहे. या टँकरसमोर कर्मचाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. विलीनीकरणाची मागणी पूर्ण होईल का याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. सातारा विभागातील कोरेगाव आगारातील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. संपात सहभागी असल्याने पाच महिने वेतन मिळालेले नाही. करोनाकाळात पतीची नोकरी गेली. पदरात चार वर्षांचा मुलगा आहे. छोटीशी शेती असून आता त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून आहे.
सध्या उसने पैसे घेऊन घरखर्च चालवावा लागत असल्याची खंत कोरेगाव आगारात दहा वर्षे वाहक म्हणून सेवा करणाऱ्या राणी भोसले यांनी व्यक्त केली. विलीनीकरणावर आम्ही ठाम आहोत. विलीनीकरण शक्य नसल्यास सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी आणि त्यानुसार वेतन द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
वेतन न मिळाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे, असे १० वर्षे वाहक असलेल्या मनीषा डाफळे यांनी सांगितले. उदरनिर्वाहासाठी शेती किंवा अन्य कामे करावी लागत आहेत. मात्र तरीही नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन दैनदिन खर्च भागवावा लागत आहे. विलीनीकरण झालेच पाहिजे आणि त्याशिवाय पर्याय नाही, असेही त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St staff firm merger heat of the day sampakari reunited azad maidan amy
First published on: 06-04-2022 at 02:30 IST