महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून आपल्या विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलला एक दिवसीय रजा आंदोलन पुकारण्यात आले आहे. मात्र या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कामगारांच्या रजा मंजुर होणार नाहीत, असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले. मात्र, मोठय़ा संख्येने कामगार रजेवर गेल्यास एसटीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विविध मागण्यांसाठी मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने एक दिवसीय रजा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रजा घेऊन हे कामगार एसटी महामंडळाच्या मुंबई सेंन्ट्रल येथील मुख्यालयावर धडक देणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी जवळपास दहा हजार कामगारांकडून रजेचे अर्ज देण्यात आल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला होता. मात्र एसटी महामंडळाने हा दावा खोडून काढला असून २हजार ७५२ रजा अर्जच प्राप्त झाल्याचे सांगितले आणि प्रशासनाने ते नामंजुरही केले आहेत. प्रवाशांची गरसोय होऊ नये यासाठी रविवारी परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बठक घेतली.