शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये झालेल्या अंत्यसंस्काराच्या जागेवरील चौथरा व मंडप मंगळवारी हटविला जाणार आहे. शिवाजी पार्कमध्ये चौथऱ्याइतकाच पर्यायी जागेचा प्रस्ताव ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान’ उभारण्यासाठी मंगळवारी पालिकेत मंजूर करून लगेच तेथे काम सुरू केले जाणार आहे. सरकारला दिलेला शब्द पाळण्यासाठी सोमवारी मध्यरात्री अंत्यसंस्काराची जागा दर्शनासाठी बंद ठेवण्याचे सेना नेतृत्वाने ठरविल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.
अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरील चौथरा व मंडप हटविण्यासाठी सरकारने कारवाईचा इशारा दिल्यावर शिवसेनेने तो स्वतहून काढण्याची भूमिका घेतली. अंत्यसंस्कारासाठी दिलेली जागा साफसूफ करून परत दिली जाईल, अशी हमी शिवसेना नेत्यांनी पालिकेकडे लेखी दिली होती. चौथरा हटविण्याचे काम सोमवारपासून सुरू होईल, असे शिवसेनेने सांगितले होते. तो शब्द पाळण्यासाठी मंडपातील प्रतिमा व अंत्यसंस्काराच्या जागेवरील दर्शन मध्यरात्रीनंतर बंद करून शिवाजी पार्कमध्ये साधारणपणे २० बाय ४० फूट इतकी जागा ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान’ उभारणीसाठी देण्याची मागणी मंगळवारी पालिकेकडे केली जाईल. त्याबाबतचा प्रस्ताव महापौर सुनील प्रभू सकाळी मांडतील. सर्वपक्षीय नेते व पालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर दुपारी तातडीने स्मृती उद्यानाच्या जागेत चौथऱ्याचे स्थलांतर केले जाईल, असे शिवसेनेच्या गोटातील सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2012 रोजी प्रकाशित
चौथरा हटणार, स्मृती उद्यान बनणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये झालेल्या अंत्यसंस्काराच्या जागेवरील चौथरा व मंडप मंगळवारी हटविला जाणार आहे.

First published on: 18-12-2012 at 04:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stage will now going to unplace smruti garden going to built