मुख्यमंत्र्यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

भीमा कोरेगाव येथील घटना हे एक कारस्थान होते. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी अशी कारस्थाने रचली जात आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सावध राहावे, अशी सूचना करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची, कार्यकारिणीची बैठक दादर येथील वसंतस्मृती येथे मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. पुण्यातील राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी भीमा कोरेगाव येथील घटनेचा अहवाल पक्षाला सादर केला. या प्रकरणात माओवादी संघटनांचा समावेश आहे. त्यांच्या सहभागाचे काही पुरावे समोर आले आहेत. राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा आणि भाजप सरकारविरोधात भावना निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे, असे अमर साबळे यांनी या वेळी सांगितले. भाजप सरकारचे दलितांसाठी सुरू असलेले काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असेही साबळे म्हणाले.

निवडणुकांच्या तोंडावर भीमा कोरेगावसारख्या घटनांद्वारे राज्यातील वातावरण बिघडवण्याचे आणखी प्रकार घडतील. तशा घटना घडवून आणल्या जातील. त्यातून पक्षाची व सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी काम करावे, सर्वाना तिरंग्याखाली एकत्र आणावे. लोकांमध्ये पक्षाचे काम पोहोचवावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसेच निवडणुकांच्या तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

२६ जानेवारी रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या संविधान बचाव रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यादिवशी तिरंगा बचाव रॅली काढावी, असा आदेश रावसाहेब दानवे यांनी दिला.

प्रत्येक बूथची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर

निवडणूक व्यवस्थापनासाठी भाजपाने बूथ पातळीवर रचना केली आहे. कार्यकर्ते नेमले आहेत. मात्र त्याचबरोबर पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने बूथची जबाबदारी घ्यावी, असाही निर्णय मंगळवारच्या बैठकीत झाला. राज्यात सुमारे ७५०० बूथ असून या माध्यमातून सर्व पदाधिकारी बूथ पातळीवरील नियोजनाशी जोडले जातील.