scorecardresearch

राज्य नाटय़ स्पर्धा : ‘वृंदावन’, ‘तेरे मेरे सपने’नाटकांवर आक्षेप; हिंदूंच्या भावना दुखावणारा आशय असल्याचा विद्यार्थी परिषदेचा दावा

नाटकांविरोधात चंद्रपूर येथे स्थानिक पोलीस ठाण्यात विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक शैलेश डिंडेवार यांनी तक्रारही दाखल केली आहे.

राज्य नाटय़ स्पर्धा : ‘वृंदावन’, ‘तेरे मेरे सपने’नाटकांवर आक्षेप; हिंदूंच्या भावना दुखावणारा आशय असल्याचा विद्यार्थी परिषदेचा दावा

मुंबई : २०१५-१६च्या राज्य नाटय़ स्पर्धेत पुरस्कारविजेत्या ठरलेल्या इरफान मुजावरलिखित ‘वृंदावन’ या नाटकासह त्यांच्याच ‘तेरे मेरे सपने’ या दुसऱ्या नाटकावरही यंदाच्या राज्य नाटय़स्पर्धेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला आहे.

चंद्रपूर केंद्रावरील ही नाटके हिंदूंच्या भावना दुखावणारी आणि भारतीय संस्कृतीचा अवमान करणारी असल्याचा दावा करीत त्यांना स्पर्धेतून बाद करण्याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

या नाटकांविरोधात चंद्रपूर येथे स्थानिक पोलीस ठाण्यात विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक शैलेश डिंडेवार यांनी तक्रारही दाखल केली आहे.

‘वृंदावन’ हे नाटक मथुरा वृंदावनातील परित्यक्तांच्या समस्येवर आधारित आहे, तर ‘तेरे मेरे सपने’ हे नाटक एका गरीब कुटुंबातील जोडप्याच्या दिवास्वप्नांवर बेतलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांच्यासह अनेक लेखकांनी वृंदावनातील परित्यक्ता महिलांच्या समस्येला याआधीही जाहीरपणे वाचा फोडलेली आहे. याच विषयावर आधारित ‘वृंदावन’ हे नाटक हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवणारे असल्याचा आक्षेप आता घेण्यात आला आहे.

‘वृंदावन’ हे नाटक २०१५-१६ साली राज्य नाटय़ स्पर्धेत पुरस्कारविजेते ठरले होते आणि इरफान मुजावर यांना त्यावेळी सर्वोत्कृष्ट लेखनाचाही पुरस्कार मिळाला होता. हे नाटक त्यानंतरही राज्य नाटय़स्पर्धेत अन्य दोन केंद्रांवर सादर झाले होते.  तर ‘तेरे मेरे सपने’ या आपल्या दुसऱ्या नाटकात असा कोणताही वादग्रस्त विषय नसल्याचे लेखक इरफान मुजावर यांचे म्हणणे आहे. मात्र, या दोन्ही नाटकांतून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या असल्याने त्यांना स्पर्धेतून बाद करावे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तसेच नाटय़प्रयोग परीनिरीक्षण मंडळाने भविष्यात अशा प्रकारच्या नाटकांना वेळीच रोखावे अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांना लिहिलेल्या पत्रात विद्यार्थी परिषदेने केली आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांकडून दखल?

नाटकावरील आक्षेपाची सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी दखल घेतली असून नाटय़प्रयोग परीनिरीक्षण मंडळाकडे विचारणा केल्याचे कळते. मंडळाने ‘वृंदावन’ला प्रयोग सादरीकरणाचे प्रमाणपत्र देताना, ज्यांनी संहितेचे परीनिरीक्षण केले त्यांचे अभिप्रायही पाठवल्याचे समजते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 05:38 IST

संबंधित बातम्या