बरनाथ येथील कानसई विभागात एका एजन्सीने शाळेसमोरच मुदत संपलेल्या चॉकलेट्सचा ढीग टाकल्याचे शनिवारी सकाळी आढळून आले. स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. बुरशी लागलेल्या या चॉकलेट्समध्ये अळ्याही पडल्या होत्या. याप्रकरणी पालिकेने संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली आहे.
सकाळी नऊच्या सुमारास कानसई विभागातील केंब्रिज प्ले ग्रुप नर्सरीसमोरील उकिरडय़ावर टाकलेला चॉकलेटस्चा ढीग स्थानिकांना दिसला. काही मुले उकिरडय़ावरील ही चॉकलेटस् गोळा करीत होती. स्थानिक शिवसेना कार्यकर्ते रवींद्र ठाकरे आणि पालिकेतील नियोजन सभापती कुणाल भोईर यांनी याप्रकरणी पालिकेच्या आरोग्य विभागाला कळविले. पालिकेचे आरोग्य निरीक्षक संदीप कांबळे यांनी तात्काळ चॉकलेटस्चा ढीग उचलला. याप्रकरणी दोषी एजन्सीकडून अडीच हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. दोन दिवस पालिका कार्यालयास सुट्टी आहे. त्यामुळे आता सोमवारी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. सध्या शाळेस दिवाळीची सुट्टी असल्याने अनर्थ टळला.