पानिपतकार विश्वास पाटील यांच्या ‘पाषाण झुंज’ या आगामी कादंबरीचे हस्तलिखित गुरुवारी सायंकाळी ठाणे येथून चोरीस गेले. शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. दरम्यान, रात्री उशिरा पाटील यांच्या कादंबरीचे हस्तलिखित सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. डी. मोरे यांनी पाटील यांची चोरीला गेलेली बॅग सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.  मात्र, ते कुठे व कसे सापडले याचा तपशील रात्री उशिरापर्यंत मिळू शकला नाही.
गडकरी रंगायतनमध्ये एका कार्यक्रमासाठी पाटील गुरुवारी सायंकाळी आले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत साहित्यिक वामन होवाळ व कवी महेश केळुस्कर होते. कार्यक्रमाआधी तिघे राममारुती रोड परिसरात एका पुस्तकाच्या दुकानात गेले. त्यांचा चालक कारमध्ये बसलेला असताना एका महिलेने गाडीजवळ पैसे पडल्याचे सांगितले. त्यामुळे चालक कारमधून बाहेर येऊन पैसे पडल्याची खातरजमा करू लागला. त्याच वेळी चोरटय़ाने कारमधील सुटकेस पळवली. त्यात पैसे नव्हत़े  पण ‘पाषाण झुंज’ कादंबरीचे हस्तलिखित होते. येत्या महिनाभरात ही कादंबरी छपाईसाठी जाणार आहे.