तरुणाची दगडाने ठेचून हत्या

 चार वर्षांपूर्वी उसने दिलेले १ लाख रु पये परत मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे बाळू बजरंग पवार (४०) यास दगडाने ठेचून मारण्याची घटना घडली.

(संग्रहित छायाचित्र)
पैशाच्या वादातून जामखेड तालुक्यात : – उच्चवर्णीय समाजातील मुलीशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून मागासवर्गीय युवकाची छळ करुन हत्या करण्याच्या घटनेने राज्यभर गाजलेले खर्डा (ता. जामखेड) गाव पुन्हा एकदा भटक्या समाजातील एकास दगडाने ठेचून मारण्याच्या घटनेने हादरले आहे.

चार वर्षांपूर्वी उसने दिलेले १ लाख रु पये परत मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे बाळू बजरंग पवार (४०) यास दगडाने ठेचून मारण्याची घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये एका आरोपीचा राज्यात गाजलेल्या नितीन आगे खूनप्रकरणात समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ खर्डा गावात आज, गुरुवारी बंद पाळण्यात आला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत खर्डा गाव बंद व मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला व वातावरण निवळल्यानंतर खर्डा बंद मागे घेण्यात आला. या गुन्ह्य़ात पोलिसांनी योगेश वालस्कर व आकाश वालस्कर या दोघांना अटक केली आहे.

मृताची मावशी वेणुबाई बाजीराव काळे हिने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून सुधीर बाळू वालस्कर, आकाश बाळू वालस्कर, योगेश बिभीषण वालस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर व राहुल गौतम तादगे (सर्व रा. खर्डा, जामखेड) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेणूबाई हिने पत्रकारांशी बोलताना या घटनेतील एक जण सन २०१४ मध्ये झालेल्या नितीन आगे खूनप्रकरणात आरोपी होता, असा दावा केला.

वेणूबाई काळे हिचे पती बाजीराव काळे यांनी खर्डा गावातील आरोपीचे वडील बाळू वालस्कर यांना चार वर्षांपूर्वी १ लाख रु पये उसने दिले होते. वेणूबाईच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. बाळू वालस्कर याने वेणूबाईस दिवाळीत पैसे देण्याचा वायदा केला. त्यामुळे वेणूबाई व मुलगा अविनाश काळे हे दोघे वालस्कर याच्या घरी मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ७.३० च्या सुमाराला, गावातील कोष्टी गल्लीत गेले. त्या वेळी वालस्कर बाहेरगावी गेल्याने दोघे घरी परतले. त्यानंतर रात्री वरील पाच आरोपी वेणूबाईच्या घरी आले व तुम्ही आमच्या घरी येऊन आरडाओरडा का केला, तसेच आमच्या महिलांना शिवीगाळ का केली असे म्हणून तिला मारहाण व शिवीगाळ करु  लागले. तेव्हा तिथे असलेला तिचा भाचा बाळू पवार हा मध्ये पडला व शिवीगाळ का करता अशी विचारणा करू लागला. याचा राग येऊन पाचही जणांनी बाळूला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. या घटनेत बाळू गंभीर जखमी झाला. त्यास खर्डा येथील खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी बार्शीला दाखल केले.  उपचार सुरू असताना त्याचा   बुधवारी रात्री बाराच्या सुमाराला मृत्यू झाला.

बाळू पवारच्या मृत्यूची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी खर्डा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गाव दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचे मयताच्या नातेवाइकांनी सांगितले व मृतदेह पोलीस दूरक्षेत्रासमोर आणून ठेवला.

सध्या खर्डा गावात तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून धडक कृती दल व राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक जावळे, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, नीलेश कांबळे यांनी भेट दिली. इतर तीन आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके नियुक्त केल्याचे जावळे यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली

गेल्या चार ते पाच वर्षांपासून जामखेड शहरासह तालुक्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून खर्डा येथे सन २०१४ मध्ये राज्यभरात गाजलेले नितीन आगे हत्याकांड तसेच वर्षांपूर्वी जामखेड शहरात भरदिवसा राळेभात बंधूंची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दुचाकी चोरणारी टोळी, भुरटया चोऱ्या, दरोडे यासारखे गुन्हे सर्रासपणे घडत आहेत.

त्या वेळी तो अल्पवयीन होता..

खर्डा येथे सन २०१४ मध्ये राज्यभरात गाजलेले नितीन आगे हत्याकांड घडले. त्यात  घडलेल्या गुन्ह्य़ातील आरोपी रोहित उर्फ बबलू गोलेकर याचाही समावेश होता. त्या वेळी तो अल्पवयीन आरोपी होता. जिल्हा न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. सध्या या नीतिन आगे प्रकरणात सरकार पक्षाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Stone murder crime news money akp