अनिश पाटील

तस्करी हा मुंबईच्या अधोविश्वाचा कणा. मुंबईत २०२२ मध्ये सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ पकडण्यात आले. डीआरआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षांत (२०२१-२२) देशात ८०० किलोपेक्षा जास्त सोन्याची तस्करी करण्यात आली. त्याची किंमत ४०० कोटींपेक्षा अधिक आहे. मुंबईची पहिल्यापासून व्यापारी शहर म्हणून ओळख होती. त्यामुळे भामटे, लुटारू, चोर, गुंड यांचा राबताही पूर्वीपासूनचाच. 

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

हाजी मस्तान, करिम लाला हे एकेकाळचे मुंबईच्या अधोविश्वातील नायक. चाकू, सोडा-बॉटलचा वापर करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा तो काळ. त्या काळात तस्करीचा पैसा आणि शक्ती यांच्या बळावर मुंबईच्या अधोविश्वावर राज्य केले जाऊ शकते, हे हाजी मस्तान, करिम लाला यांनी दाखवून दिले. मुंबईतील गुन्हेगारीला तत्कालीन सामाजिक, राजकीय व व्यापारी परिस्थितीही जबाबदार होती. परिस्थितीनेच पोसलेल्या या अधोनायकांनी पुढे संपूर्ण देशात आपली दहशत निर्माण केली.

काळानुसार मुंबई, तेथील गुन्हेगारीचे स्वरूप बदलत गेले. मात्र, प्रत्येक टप्प्यावर एखाद्या मिथकाप्रमाणे मुंबईच्या अधोविश्वातील किस्से, घटना, पात्र ही अनेक पिढय़ांच्या स्मरणात राहिली. मुंबईची गोदी हे तर त्यांचे केंद्र. फार पूर्वी, म्हणजे नेमके सांगायचे तर १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातही गोदीवर गुंडांच्या टोळय़ांचा धुमाकूळ चालत असे.

‘मुंबईचे वर्णन’ या १८६३ सालच्या गोविंद नारायण मडगांवकर यांच्या पुस्तकात त्याचे उल्लेख येतात. ते सांगतात, ‘अट्टल तर्कटी लोकांची जूट पुष्कळ वर्षांपासून मुंबईत होती, हीस बंदरग्यांग असें म्हणत. सर्व मिळून सुमारें तीनशें लोकांची टोळी होती. हींत कित्येक लाखो रुपयांचे धनीं होते..’ हे लोक काय करीत, तर ‘बाहेर गावांतून तंबाखू व इतर माल आणून बंदरांत उतरवीत. तो जकात भरल्यावांचून शहरांत आणून वखारींत भरून टाकीत. हें कृत्य साधायास त्यांनी कनिष्टेबल, हवालदार, व पोलीसचे व कष्टम खात्यांतील कित्येक शिपायांस दरमहा ठरवून आपल्या हाताखाल करून ठेंविले होतें!’

स्वतंत्र्यानंतरही तस्करी आणि त्यांच्या टोळय़ा कमी झाल्या नाहीत. हाजी मस्तान आणि युसूफ पटेल हे त्यातलेच तस्कर. ज्याच्यावर ‘दिवार’ हा सिनेमा बेतलेला आहे असे म्हणतात तोच हा मस्तान. सोने, चांदी, कपडे, विद्युत उपकरणे यांची त्या काळात तस्करी व्हायची. तस्करीच्या हद्दीवरून या दोघांत कमालीचे वाद व्हायचे, पोलिसांमार्फत एकमेकांचा माल पकडवून दिला जायचा. त्याच वादातून टोळीयुद्धाचा जन्म झाला. त्याचा इतिहासही मोठा थरारक आहे.

तस्करी दुनियेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी हाजी मस्तानने युसूफ पटेल याला ठार मारण्यासाठी दहा हजार रुपयांची सुपारी डोंगरीचा सुपारी किंग करीम लाला याला दिली होती. करीम लाला हा मूळचा अफगाणिस्तानच्या कुनारचा. तो पेशावरमार्गे १९३४ मध्ये मुंबईत आला. तस्करांना संरक्षण देणे, जुगार अशा धंद्यात त्याने जम बसवला आणि नंतर तो हिऱ्यांच्या तस्करीतही उतरला. त्याने युसूफ पटेलला मारण्यासाठी अफगाणिस्तानातून चार पठाण आणले. पायधुनी येथील मिनार मशिदीजवळ २२ नोव्हेंबर १९६९ च्या मध्यरात्री युसूफ पटेल नेहमीप्रमाणे घराबाहेर पडताच पठाण टोळीने त्याच्यावर गोळय़ा झाडल्या. मात्र पटेलच्या अंगरक्षकाने स्वत: गोळय़ा झेलून त्याला वाचविले. मुंबईतल्या टोळी युद्धातील तो पहिला बळी म्हणता येईल. मस्तान आणि पटेलचे शत्रुत्त्व फार काळ टिकले नाही, कालांतराने त्यांची पुन्हा हात मिळवणी झाली.

तस्करांच्या राज्यात मुंबईत छोटय़ा-मोठय़ा दादांचीही चलती होती. माटुंग्याचा वरदाराज मुदलीयार ऊर्फ वरदा गोदीतील तस्करी व गावठी दारूच्या भट्टय़ा चालवायचा. माटुंगा, अँटॉपहिल, धारावी परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. वरदा मूळचा तामिळनाडूतील वेल्लोर येथील. पण कामाची गरज अनेकांना मुंबईकडे खेचून आणायची, त्यातलाच तो एक. त्याची खऱ्या अर्थाने भरभराट झाली, ती हाजी मस्तानशी हातमिळवणी केल्यानंतर. मुंबईवर राज्य करण्यासाठी पैशांसह दहशतही आवश्यक होती हे गणित हाजी मस्तानला उमगले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईत करीम लाला, मध्य मुंबईत वरदा राजन या दोघांना हाताशी घेऊन हाजी मस्तान मुंबई बंदरातील तस्करीचा बादशाह झाला. कालौघात त्याच्या सत्तेला उतरती कळा लागली.

हाजी मस्तानला १९७४ आणि नंतर १९७५ मध्ये अटक झाली. परिस्थिती लक्षात घेऊन मस्तान कालांतराने बांधकाम क्षेत्रात शिरला. पुढे १९८२ मध्ये मध्य मुंबईतील तत्कालीन परिमंडळ ४ ची जबाबदारी उपायुक्त वाय. सी. पवार यांनी घेतली आणि वरदाचाही पडता काळ सुरू झाला. त्याच्या काळय़ा धंद्यांवर कारवाई केली, त्याच्या गणेश मंडळावर अनेक निर्बंध आणून वरदाचे महत्त्वच कमी करून टाकले.

१९८७ पर्यंत वरदा पूर्ण पण रसातळाला गेला. अखेर मुंबई पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने वरदाने पुन्हा चेन्नई गाठली. पुढे २ जानेवारी, १९८८ ला तेथे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. काळ कोणासाठी थांबत नाही, असे म्हटले जाते. या अधोनायकांच्या पडत्या काळानंतर दुसऱ्या फळीने मुंबईतील अधोविश्वातील जागा घेतली. तो काळ आणखी भयाण होता.