‘एम पूर्व’ विभागात नागरिकांची बेशिस्त सुरूच; पोलिसांशी हुज्जत, दगडफेकीच्या घटना

मुंबई : करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘हॉटस्पॉट’ ठरत चाललेल्या मुंबई महापालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागातील संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलिसांनी कडक निर्बंध आणले आहेत. मात्र या विभागातील चेंबूर, माहुल, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे या भागांतील नागरिक आजही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांना हटकणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे किंवा त्यांच्यावर दगडफेक करणे, असे प्रकारही घडू लागले आहेत. त्यामुळे या वस्त्यांमध्ये करोना पसरू नये म्हणून भिंत बनून उभे राहिलेले पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा आता हतबल झाले आहेत.

एम पूर्व विभागात चेंबूर, माहुल, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे या उपनगरांचा समावेश आहे. या विभागातील सुमारे ८० टक्के लोकवस्ती झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्य करते. येथील घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्याशेजारील झोपडपट्टी धारावीपेक्षा मोठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील परिस्थितीही गंभीर आहे. हीच परिस्थिती चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग, मानखुर्दचे अण्णाभाऊ साठे नगर, महाराष्ट्र नगर, पीएमजीपी वसाहत, गोवंडीचे टाटा नगर, ट्रॉम्बेचे चित्ता कॅ म्प येथील झोपडपट्टय़ांची आहे.

या विभागातील प्रमुख रस्ते, मार्गावर शुकशुकाट असला तरी या दाट लोकवस्त्यांतील रहिवासी आपल्याला करोनाची बाधा होणारच नाही अशा आविर्भावात आहेत. येथे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होतेच पण खरेदीचे निमित्त करून संध्याकाळी पाचनंतर घराबाहेर पडणारे रात्री बारानंतरही घरी परतत नाहीत. हातावर ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के असलेल्या अनेक व्यक्ती वस्त्यांमध्ये राजरोस फिरताना आढळतात. इतके च नव्हे तर शिक्केधारी व्यक्ती महापालिका कर्मचाऱ्यांना कु ठे फवारणी करावी, काय उपाय योजावेत याचे मार्गदर्शनही करताना दिसतात. या वस्त्यांमध्ये शिधावाटप केंद्र, किराणा मालाची दुकाने, दुग्धालये, फळ-भाजी बाजारपेठांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी नागरिक मोठय़ा प्रमाणावर गर्दी करतात. शहराच्या अन्य भागांतही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी के ली जाते. मात्र एम पूर्व विभागातल्या वस्त्यांमध्ये होणारी गर्दी यंत्रणांना जास्त धोकायदाक वाटते. याचे कारण गर्दीला अलगीकरणाचे ताळतंत्र नाहीच, पण मास्क किं वा कापडाने चेहरा झाकण्याचे गांभीर्यही नाही.

येथील शिवाजीनगर, देवनार, गोवंडी, मानखुर्द, टिळकनगर, ट्रॉम्बे, आरसीएफ आदी पोलीस ठाण्यांनी कठोर कारवाईसह सातत्याने जनजागृती करून या वस्त्यांना करोनाचे गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न के ला. पोलिसांच्या विनंतीवरून येथील प्रार्थनास्थळांनी सातत्याने करोनाचे गांभीर्य आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत उद्घोषणा सुरू के ल्या. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी येथील दुकाने व फळविक्रीस १५ एप्रिलपर्यंत पूर्णत: बंदी घातली आहे, तर किराणा दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत सुरू ठेवण्यात आली आहेत. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दक्ष आहेत. मात्र या वस्त्यांमधील नागरिक पोलिसांशीच वाद घालत आहेत. शिवाजीनगर परिसरात सोमवारी पोलिसांच्या वाहनावर दगडफेकही करण्यात आली.

‘गर्दी होऊ नये यासाठी बाजारपेठा, दुकाने दुपारनंतर बंद के ली जात आहेत. संध्याकाळी दीड ते दोन तास पोलीस ठाण्यासह राज्य राखीव पोलीस बलाचे जवान हद्दीत, त्या त्या वस्तीत संचलन करतात. जोवर नागरिकांना स्वत:हून करोनाच्या धोक्याची जाणीव होत नाही तोवर प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात अडथळे येतील,’ अशी प्रतिक्रि या पोलीस उपायुक्त (अतिरिक्त कार्यभार) शहाजी उमाप यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त के ली.

पालिका कर्मचाऱ्यांना हुसकावले

शिवाजीनगर परिसरात क्वारंटाइनचे शिक्के असलेल्या व्यक्ती रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्यांना मंगळवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी हटकले. तेव्हा शिक्के  असलेल्या व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून वस्तीतून हुसकू न लावले.