उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक स्तरावर प्लास्टिकची वाढती मागणी बघता प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यात या उद्योगासाठी वेगळे क्लस्टर निर्माण करून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्लास्टिक उद्योजकांना दिले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिकचे विघटन आणि त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी पुढाकार घेऊन पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन देसाई यांनी केले.

‘द प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल’द्वारा आयोजित पुरस्कार समारंभात ते बोलत होते. प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य विभागाचे सहसचिव श्यामल मिश्रा, प्लेक्स काऊन्सिलचे अध्यक्ष अशोककुमार बसाक आदी उपस्थित होते.

जागतिकस्तरावर प्लास्टिकची वाढती मागणी बघता प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यात या उद्योगासाठी वेगळे क्लस्टर निर्माण करून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यात लघु, मध्यम व मोठय़ा उद्योगांसाठी सुविधा केंद्रांचा समावेश असेल. राज्यात तसेच देशातील काही भागात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी आहे. त्यामुळे त्याचे विघटन आणि पुनर्वापर याबाबतीत अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे. राज्यात सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर प्लास्टिक अँड इंजिनीअरिंग (सिपेट) ही संस्था चांगले काम करीत आहे. या संस्थेच्या अधिक शाखा उघडण्यात येतील. ‘इज ऑफ डुइंग बिजनेस’मध्ये राज्याचा नंबर पुन्हा एकदा पहिल्या तीनमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

अमेरिका, चीन, लॅटिन अमेरिका, आफ्रिका या देशात भारतातून प्लास्टिक निर्यात होण्याचे प्रमाण उत्तम आहे. इतर देशातील बाजारपेठेत शिरकाव करणे आवश्यक असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. फ्रान्स, जपान, चेक रिपब्लिक, नॉर्वे यासारख्या अनेक देशात निर्यातीच्या संधी उपलब्ध आहेत. प्लास्टिक निर्यातीत कच्च्या मालाची जास्त प्रमाणात निर्यात होते. मात्र प्लास्टिकपासून तयार झालेल्या उत्पादित मालाची निर्यात करण्यावर भर द्यावा, जेणेकरून देशातील प्रशिक्षित मनुष्यबळास रोजगाराच्या संधी मिळतील अशी आशा मिश्रा यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash desai maharashtra plastic ban
First published on: 22-07-2018 at 01:12 IST