करोनाच्या नव्या विषाणूचा थैमान सुरू असलेल्या ब्रिटनमधून गेल्या महिनाभरात मुंबईत दाखल झालेल्या सुमारे एक हजार नागरिकांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. या सर्वाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने पालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आणखी काही नागरिकांचा शोध पालिका घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू सापडल्यामुळे चिंतेचे वातावरण असून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. परिणामी ब्रिटनहून भारतात येणारी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या महिनाभरात म्हणजे २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनहून सुमारे १५९३ प्रवासी मुंबईत आले असून त्यांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून पालिकेला उपलब्ध झाली आहे. या यादीच्या आधारे पालिकेने प्रवाशांचा शोध सुरू केला आहे.

आतापर्यंत सुमारे एक हजार प्रवाशांचा शोध घेण्यात पालिका यशस्वी झाली असून या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान प्रवाशांना करोनाची लक्षणे आहेत का याची खातरजमा करण्यात येत आहे. मात्र वैद्यकीय तपासणी केलेल्या प्रवाशांमध्ये तूर्तास तरी एकालाही लक्षणे नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

शोधमोहीम युद्धपातळीवर

ब्रिटनहून आलेल्या नागरिकांना करोनाच्या नव्या संसर्गाची बाधा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी तेथून  आलेल्या सर्वाचा शोध घेण्यात येत आहे. एखाद्याला बाधा झाली असेल, तर त्याच्यामुळे अन्य नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही शोधमोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. उर्वरित ५९३ प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success in finding 1000 passengers from britain abn
First published on: 26-12-2020 at 00:00 IST