शैलजा तिवले

मुखकर्करोगाच्या संशयित २५ टक्के कर्मचाऱ्यांचा तंबाखूला कायमचा रामराम;  तीन कर्करुग्णांचे वेळेत निदान

‘साधारण चार वर्षांपूर्वीच सुरू झालेले तंबाखूचे व्यसन जिवावर बेतेल, याचा कधीच विचार मनात आला नव्हता. गेल्या सहा महिन्यांत झालेल्या त्रासानंतर तंबाखूकडे पाहण्याची इच्छासुद्धा होत नाही. माझी ही अवस्था पाहून माझ्या बरोबरीच्या मित्रांनीही तंबाखू सोडली,’ असे सांगणाऱ्या वांद्रे डेपोतील बेस्टचे कर्मचारी नितीन (नाव बदलले आहे) यांना तंबाखू आरोग्यासाठी कशी घातक ठरू शकते हे चांगलेच पटले आहे.

बेस्टच्या तंबाखूमुक्त कार्यक्रमाला यश आले असून यामधून तीन कर्करोग रुग्णांचे वेळेत निदान होऊन उपचारदेखील सुरू झाले आहेत. तसेच कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळलेल्या २५ टक्के कर्मचाऱ्यांनी तंबाखूला कायमचा राम राम ठोकला आहे.

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी बेस्टच्या १३ हजार ३६७ कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली. यातील १,४६३ जणांना मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळली होती. निदानासाठी त्यांची बायोप्सी करण्यात आली. टाटा मेमोरियल रुग्णालयात ६२४, इंडियन कॅन्सर सोसायटीमध्ये ३६९ अशा एकूण ९९३ रुग्णांची बायोप्सी केली गेली. यामध्ये तीन जणांना कर्करोग असल्याचे निदान झाले. नितीन यांचा यामध्ये समावेश असून जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्या तोंडातील कर्करोगाची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढली आहे.

मी दिवसातून एकदा किंवा दोनदाच तंबाखू खायचो. डेपोमध्ये तपासणीसाठी डॉक्टर आले तेव्हा मला तोंड आले होते. पंधरा दिवसांपासून तोंड येणे, तोंडाला दरुगधी येणे या तक्रारी सुरू होत्या. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. डॉक्टरांनी मात्र कर्करोग असल्याचा संशय व्यक्त करत पुढील तपासण्या करायला सांगितल्या. तेव्हा मलाच मोठा धक्का बसला. मी तातडीने नाशिकहून माझ्या वडिलांना बोलावले. ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आणि उपचार सुरू केले. बेस्टनेही आरामासाठी एक वर्षांची रजा मंजूर केली. बेस्टमध्ये वेळेत तपासण्या झाल्याने प्राथमिक टप्प्यावरच आजाराचे निदान झाले. निदानापासून ते आतापर्यंत मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ाही खूप सोसले आहे. त्यामुळे आता माझ्या जवळच्यांना तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी समजावत असतो, असे नितीन सांगतात.

मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळलेल्या १४३६ रुग्णांपैकी ४६९ रुग्ण बायोप्सीसाठी येत नसल्याने अखेर बेस्टने टाटा रुग्णालयाच्या मदतीने ते कार्यरत असलेल्या कुलाबा, धारावी, ओशिवरा, मागाठाणे, शिवाजीनगर, दिंडोशी, मरोळ इत्यादी डेपोमध्ये १७ ते ३१ जुलै या कालावधीत बायोप्सी तपासणी शिबीर सुरू केले आहे.

धारावी डेपोतील ड्रायव्हर तानाजी घाडगे (५४) यांच्या दीड वर्षांपूर्वी डेपोत केलेल्या तपासणीमध्ये मुख कर्करोग असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता. या आजाराची धास्ती बसल्यानंतर त्यांनी तंबाखू खाणेच सोडून दिले. तातडीने उपचार सुरू केले. त्यामुळे दीड वर्षांत त्यांची सर्व लक्षणे गेली असून ते पूर्ववत बरे झाले आहेत. ‘बाराव्या वर्षांपासून मी तंबाखू खातो. एक गाडी मारली की तंबाखू मळायची. असे दिवसातून किती वेळा खायचो हे मला सांगणेही अवघड आहे.  तपासणीनंतर वेळेत सावध झाल्याने या आजारापासून मी मुक्त झालो आहे,’ असे तानाजी मोठय़ा समाधानाने सांगतात.

*  बेस्टच्या १३ हजार ३६७ कर्मचाऱ्यांची तपासणी

*  १४३६ रुग्णांना मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे

*  बायोप्सीच्या माध्यमातून तीन जणांना कर्करोगाचे निदान

बेस्टने केलेल्या तपासणीत मुख कर्करोग आढळलेल्या जवळपास २५ टक्के कर्मचाऱ्यांनी तातडीने तंबाखू सोडली. त्यामुळे संभाव्य आजारापासून त्यांची सुटका झाली आहे. वेळेत निदान झाल्याने हे शक्य होऊ शकले आहे. तंबाखूमुक्त बेस्टच्या उपक्रमांतर्गतही सुरू केलेल्या मॅजिक मिश्रणाचा वापर करत अनेक कर्मचाऱ्यांनी तंबाखूच्या व्यसनातून स्वत:ला सोडविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. अनिलकुमार सिंघल, बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक