इराकमध्ये जन्मलेल्या व हृदयाच्या जन्मजात विकाराने ग्रस्त असलेल्या एका बालकावर मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. एक महिना वयाच्या या बालकाला ‘डी-टीजीए’ (डेक्स्ट्रो-ट्रान्सपोझिशन ऑफ द ग्रेट आर्टरीज) हा आजार जन्मतःच झालेला होता. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील बाल हृदयरोग चिकित्सा केंद्राचे संचालक डॉ. सुरेश राव यांच्या नेतृत्त्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाने या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याच्या हृदयातील दोष काढून टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डी-टीजीए’ या आजारांमध्ये हृदयातून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या महाधमनी आणि फुफ्फुसीय धमनी या दोन मुख्य वाहिन्या त्यांच्या मूळ जागेवरून सरकून एकमेकींची जागा घेतात. हा दोष सुधारण्यासाठी धमन्या मूळ जागेवर बसविण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. या बाळावर ती करावी लागली, तसेच ‘एट्रियल सेप्टल डिफेक्ट’ (हृदयाला पडलेले छिद्र) हे बुजवण्यासाठीही शस्त्रक्रिया करावी लागली. यातून बाळ बरे झाले. रक्ताभिसरण बिघडल्याने अंग निळसर पडलेल्या आणि आता ते सुधारल्याने गुलाबी झालेल्या बाळाला घेऊन पुन्हा मायदेशी परतण्याची तयारी त्याचे पालक करू लागले आहेत.

डॉ. सुरेश राव याबाबत म्हणाले, ‘’रुग्ण असलेल्या या बालकाचे अंग जन्मतःच निळसर होते. त्याच्या हृदयामध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागुंत असल्याचे निदान झाले होते. थोडक्यात सांगायचे, तर त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण उलटे होत होते. अशी स्थिती पाच हजार नवजात मुलांमधील एकामध्ये असते. लवकर शस्त्रक्रिया झाली नाही तर हे मूल दगावते. भारतात नवजात बालके व लहान मुले यांच्यावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे ही नेहमीचीच बाब आहे. इराक या देशात मात्र अशा सोयीचा अभाव असल्यामुळे या बाळावर तेथे उपचार होऊ शकले नाहीत. सुदैवाने, बाळाच्या वडिलांच्या भारतात राहणाऱ्या एका मित्राने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला.’’

‘’बाळावरील शस्त्रक्रियेस उशीर झाला असता, तर ती करूनही उपयोग झाला नसता; कारण रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी हृदय पुरेसे सशक्त राहिले नसते. बाळाच्या सुदैवाने, इराकमधील एका स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर ‘बीएएस’ (बलून एट्रियल सेप्टोस्टॉमी) ही प्राथमिक उपचार पद्धती करण्यात आली होती. हृदयाचे कार्य स्थिर होण्याकरीता ती केली जाते. त्या उपचारांना बाळाने चांगला प्रतिसाद दिला होता व त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढली होती. विमानाने भारतात येण्याकरीता त्याची ही स्थिती सहाय्यभूत ठरली.’’ असंही राव यांनी स्पष्ट केलं.

नवा पासपोर्ट मिळवणे, इराकमधील भारतीय दुतावासाकडून वैद्यकीय व्हिसा घेणे आणि अखेरीस भारताच्या विमानात जागा पटकावणे ही मोठी आव्हाने बाळाच्या पालकांपुढे होती.  जबर इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयांमुळे या आव्हानांवर त्यांना मात करता आली व ते २४ सप्टेंबर रोजी मुंबईला पोहोचले. येथे आल्यावरही त्यांच्यापुढील अडचणी संपल्या नाहीत. बाळाच्या आईला करोना असल्याचे निष्पन्न झाले व तिला विलग करण्यात आले. नशीबाने बाळ व त्याचे वडील यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली. तरीदेखील बाळाच्या वडिलांना आठवडाभर विलग करण्यात आले व बाळाला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यामुळे त्याच्यावरील उपचार व शस्त्रक्रिया यांना आठवडाभर विलंब झाला. बाळाच्या आई वडिलांनीही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful surgery on blue baby from iraq in mumbai scj
First published on: 16-10-2020 at 19:28 IST