Premium

प्रदूषणमुक्तीसाठी मुंबईत ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी धारावीतून मोहिमेला सुरुवात

स्वच्छ, सुंदर, नेटनेटकी आणि हरित मुंबईसाठी व्यापक स्तरावर ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम राबविण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

Sumpurna Swachhta campaign in Mumbai
महानगरपालिकेने ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : स्वच्छ, सुंदर, नेटनेटकी आणि हरित मुंबईसाठी व्यापक स्तरावर ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम राबविण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई धुळमुक्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबरोबरच महानगरपालिका आता बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, फेरीवालाविरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कामे हाती घेणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या मोहिमेत सहभागी होण्यासाठी माजी नगरसेवक, समाजसेवक, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदींना साद घातली आहे.

मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा स्तर दिवसेंदिवस ढासळत आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर वाढावा यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर प्रदूषण वाढू नये यासाठी काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. आता महानगरपालिकेने ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता धारावी येथून या मोहिलेला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

आणखी वाचा-खिचडी गैरव्यवहारात शिंदे गटाचा पदाधिकारी; संस्थेवर गुन्हा, भागीदारांच्या नामोल्लेखास बगल

या विशेष मोहिमेअंतर्गत रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कार्यवाही केली जाणार आहे. या स्वच्छता मोहिमेत अशासकीय संस्था-संघटना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरूण, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, उद्योजक, समाजातील ख्यातनाम व्यक्ती आदींना सहभागी करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेत सहभागी होण्यासाठी महानगरपालिकेने लोकप्रतिनिधीनाही साद घातली आहे.

आणखी वाचा-धुक्यामुळे मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा; वेळापत्रक विस्कळीत, नोकरदारांचे हाल

मुंबईला धुळीपासून मुक्ती देण्यासाठी रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे पाण्याने धुण्यात येत आहेत. आता ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम राबविण्याचा धोरणात्मक निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त इक्लाब सिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेची रूपरेषा ठरविण्यात आली. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ – १) संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ – २) रमाकांत बिरादार यांच्यासह सहायक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकारी – अभियंता या बैठकीस उपस्थित होते.या मोहिमेमध्ये वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग सहभागी होणार आहे. तसेच यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.

स्वच्छता मोहिमेला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप यायला हवे. त्यासाठी मुंबईकरांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sumpurna swachhta campaign in mumbai campaign started from dharavi on sunday mumbai print news mrj

First published on: 02-12-2023 at 15:54 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा