आज ज्या ठिकाणाविषयी मी लिहिणार आहे, ते ऐतिहासिकदृष्टय़ा खूप मोठे आहे. अत्यंत प्राचीन वारसा असलेले आहे आणि तरीही दुर्दैवानी अत्यंत दुर्लक्षित आहे. संरक्षित स्मारक असा  उल्लेख असणारा पत्र्याचा फलकसुद्धा जिथे लोखंडाच्या जाळीने संरक्षित करावा लागतो, तिथे खुद्द त्या स्मारकाची दुर्दशा काय वर्णावी! प्रेक्षणीय स्थळ बघण्याच्या अपेक्षेनी जाणाऱ्यांसाठी निश्चितच हे स्थळ नाही, पण आपल्या देशाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे, काळाचा एक वैशिष्टय़पूर्ण खंड, त्या वेळची सामाजिक स्थिती कल्पना करून पाहावी अशी ओढ ज्यांना वाटते, त्यांनी हे ठिकाण अनुभवावे, अशी शिफारस मी जरूर करेन.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर नालासोपारा स्टेशनच्या पश्चिमेला सोपारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आधी शूर्पारक मैदानावर भगवान बुद्धांची भव्य मूर्ती दिसते. नंतर सोपारा गावच्या वेशीवर सम्राट अशोककालीन कमानीची आधुनिक प्रतिकृती आपले स्वागत करते. सावरीचे वृक्ष, नारळाची झाडे यांनी सावली धरलेल्या रस्त्यावर उजव्या बाजूला एका तळ्यात काठावरची वृक्षराजी आपले प्रतिबिंब न्याहाळताना दिसतात. या सुंदर नैसर्गिक तळ्यात प्लास्टिकच्या बाटल्या आणि निर्माल्याच्या पिशव्या तरंगत नसत्या, तर त्याच्या सौंदर्याला गालबोट लागले नसते. डाव्या हाताला स्मारकाची माहिती देणारे जुने गंजके फलक आहेत. खुद्द भगवान बुद्ध ज्या स्तुपाच्या उद्घाटनाला आले, सम्राट अशोकाची मुले : महेंद्र आणि संघमित्रा यांनी ज्या ठिकाणाचे दर्शन घेतले, डॉ.आंबेडकर जिथे अनेकदा येऊन गेले, ते ठिकाण इतके उपेक्षित असावे याचे वैषम्य वाटते. पूर्ण नावाच्या ज्या व्यापाऱ्यांनी हा स्तूप उभारला, त्यांनी भगवान बुद्धांची आठवण म्हणून त्यांचे भिक्षापात्र मागितले, तेसुद्धा लंडनच्या वस्तुसंग्रहालयात आहे. नंतर केल्या गेलेल्या उत्खननात सापडलेल्या मौल्यवान वस्तू अन्य ठिकाणी स्थलांतरित केल्या गेल्या आहेत. बाहेरून पाहता प्रथमदर्शनी एका जुन्याजाणत्या आम्रवृक्षाचा भव्य बुंधा आणि शेवाळलेल्या विटांचा ढीग नजरेसमोर भिंत उभी करतो. आत पडझड झालेल्या विटांच्या ढिगाऱ्याशिवाय काही नाही, असेच एवढी वर्षे मी ऐकत आले. ते खोटे आहे असे नाही.तरीही या ठिकाणाची माहिती मी देतेय कारण जे दिसतं आणि जे जाणवते त्यात खूप फरक असतो.

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
History of Geography Long lasting regimes For the economic prosperity of the people Water management
भूगोलाचा इतिहास: राजवटींच्या दीर्घायुष्याचे रहस्य?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

प्रवेशद्वारामधून आत शिरून आपण उंचवटा चढून वर येतो आणि काळाच्या एखाद्या हरवलेल्या तुकडय़ात प्रवेश केला की काय असा भास होतो. चहुबाजूंनी एखाद्या अ‍ॅम्पी थिएटरसारखा उंचवटा आणि मधोमध नजरेचा केंद्रबिंदू ठरतील, असे स्तुपाचे लाल विटांचे भग्न अवशेष आहेत. प्राचीन काळचे मंदिर किंवा मूर्तीचे असावेत असे काही तुरळक अवशेष अन् एक-दोन मूर्ती आढळतात. मुख्य स्तुपाच्या आजूबाजूला विटांची गोल बैठक असावी, असेही काही बांधकाम आहे. या सर्वाना वेढणारी ताडाची झाडे इथे विपुल प्रमाणात आहेत. शूर्पारक हे प्राचीन काळी मोठे बंदर होते याची साक्ष देणारी वाळवंटात आढळणारी खजुराची झाडेसुद्धा या परिसरात आहेत. जमिनीवर खुरटे गवत, ताडाच्या झाडाचे काळे पडलेले जाळीदार कोन, फुटलेले हिरवे कोंब आणि अगदी चिमुकली रंगीबेरंगी फुले येणाऱ्या रानवनस्पती यांचे राज्य येथे आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या उपासनेचे तरंग  येथे अजून जाणवतात. डोळे उघडे ठेवून वा बंद केले तर मन मौनात अगदी विनासायास विलीन होते. ऐन वैभवात असताना या स्तुपाची रचना कशी असेल? इथे उपासना करणारे भिक्खू कसे वावरत असतील? याची आपण कल्पनाही करू शकत नाही. इथल्या शांततेत पक्ष्यांची किलबिलसुद्धा फार लक्ष वेधून घेत नाही. तुमच्या आसपास मुक्त विहरणारी रंगीबेरंगी फुलपाखरेही मौनाचा आनंद घेताहेत असे वाटते. दूरवरून येणारे निर्मळच्या चर्चमधल्या घंटेचे मंजुळ पण धीरगंभीर टोले वातावरणाला एक वेगळी मिती प्रदान करतात.

अवशेष तसेच ठेवून इथे सभोवती सुंदर हिरवळ राखली, वा त्या काळची सफर घडवणारा सुंदर ध्वनिप्रकाश शो सायंकाळी ठेवला, तर या ठिकाणचा कायापालट होईल. एखादे ध्यानगृहही उभारता येईल. कदाचित पुरातत्त्व खात्याच्या नियमांनुसार यातले काहीही करायला बंदी असेल, पण निदान हे ठिकाण आणि समोरचे सुंदर तळे आहे तसे छान जतन केले पाहिजे ही इच्छा तरी पूर्ण व्हावी.

कसे जाल?

शूर्पारक स्तूप

नालासोपारा स्थानकाच्या पश्चिमेकडून निर्मळला जाणाऱ्या बस आणि शेअर रिक्षा मिळतील.