आज ज्या ठिकाणाविषयी मी लिहिणार आहे, ते ऐतिहासिकदृष्टय़ा खूप मोठे आहे. अत्यंत प्राचीन वारसा असलेले आहे आणि तरीही दुर्दैवानी अत्यंत दुर्लक्षित आहे. संरक्षित स्मारक असा  उल्लेख असणारा पत्र्याचा फलकसुद्धा जिथे लोखंडाच्या जाळीने संरक्षित करावा लागतो, तिथे खुद्द त्या स्मारकाची दुर्दशा काय वर्णावी! प्रेक्षणीय स्थळ बघण्याच्या अपेक्षेनी जाणाऱ्यांसाठी निश्चितच हे स्थळ नाही, पण आपल्या देशाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे, काळाचा एक वैशिष्टय़पूर्ण खंड, त्या वेळची सामाजिक स्थिती कल्पना करून पाहावी अशी ओढ ज्यांना वाटते, त्यांनी हे ठिकाण अनुभवावे, अशी शिफारस मी जरूर करेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर नालासोपारा स्टेशनच्या पश्चिमेला सोपारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आधी शूर्पारक मैदानावर भगवान बुद्धांची भव्य मूर्ती दिसते. नंतर सोपारा गावच्या वेशीवर सम्राट अशोककालीन कमानीची आधुनिक प्रतिकृती आपले स्वागत करते. सावरीचे वृक्ष, नारळाची झाडे यांनी सावली धरलेल्या रस्त्यावर उजव्या बाजूला एका तळ्यात काठावरची वृक्षराजी आपले प्रतिबिंब न्याहाळताना दिसतात. या सुंदर नैसर्गिक तळ्यात प्लास्टिकच्या बाटल्या आणि निर्माल्याच्या पिशव्या तरंगत नसत्या, तर त्याच्या सौंदर्याला गालबोट लागले नसते. डाव्या हाताला स्मारकाची माहिती देणारे जुने गंजके फलक आहेत. खुद्द भगवान बुद्ध ज्या स्तुपाच्या उद्घाटनाला आले, सम्राट अशोकाची मुले : महेंद्र आणि संघमित्रा यांनी ज्या ठिकाणाचे दर्शन घेतले, डॉ.आंबेडकर जिथे अनेकदा येऊन गेले, ते ठिकाण इतके उपेक्षित असावे याचे वैषम्य वाटते. पूर्ण नावाच्या ज्या व्यापाऱ्यांनी हा स्तूप उभारला, त्यांनी भगवान बुद्धांची आठवण म्हणून त्यांचे भिक्षापात्र मागितले, तेसुद्धा लंडनच्या वस्तुसंग्रहालयात आहे. नंतर केल्या गेलेल्या उत्खननात सापडलेल्या मौल्यवान वस्तू अन्य ठिकाणी स्थलांतरित केल्या गेल्या आहेत. बाहेरून पाहता प्रथमदर्शनी एका जुन्याजाणत्या आम्रवृक्षाचा भव्य बुंधा आणि शेवाळलेल्या विटांचा ढीग नजरेसमोर भिंत उभी करतो. आत पडझड झालेल्या विटांच्या ढिगाऱ्याशिवाय काही नाही, असेच एवढी वर्षे मी ऐकत आले. ते खोटे आहे असे नाही.तरीही या ठिकाणाची माहिती मी देतेय कारण जे दिसतं आणि जे जाणवते त्यात खूप फरक असतो.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surparak stupa nalasopara
First published on: 01-12-2016 at 01:41 IST