राज्यात १ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियान

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी केले. राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ प्रभाग स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या प्रभागास ५० लाख रुपयांचे बक्षीस व स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम शहरांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची व अमृत शहरे व अमृत योजनेत सहभागी नसलेल्या शहरांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा त्यांनी केली. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह भिवंडी, उल्हासनगर, पनवेल, ठाणे आदी महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर -म्हैसकर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून स्वच्छता अभियानाच्या प्रगतीची माहिती घेतली.

येत्या १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ प्रभाग स्पर्धा होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार असून यातील पहिल्या तीन प्रभागांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांतील पहिल्या तीन  प्रभागांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख तर ‘क’ व ‘ड’ वर्ग महानगरपालिकेतील प्रभागांना अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ‘अ’ वर्ग नगरपरिषदासाठी अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख तर ‘ब’ वर्ग नगरपरिषदांसाठी २० लाख, १५ लाख, १० लाख आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदांसाठी अनुक्रमे १५ लाख, १० लाख व पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

अमृत योजनेत समाविष्ट शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन गुणानुक्रमात आलेल्या राज्यातील शहरांना २० कोटी तर, चार ते १० क्रमांकामध्ये आलेल्या शहरांना १५ कोटी देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागीय गुणानुक्रमात येणाऱ्यांसाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली असून यामध्ये पहिल्या 3 क्रमांकात येणाऱ्या शहरांना १५कोटी, टार ते १० क्रमांकामध्ये येणाऱ्यांना १० कोटी तर, ११ ते ५० क्रमांकामधील शहरांना पाच कोटी रुपयांची प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांतील पहिल्या तीन  प्रभागांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख तर ‘क’ व ‘ड’ वर्ग महानगरपालिकेतील प्रभागांना अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ‘अ’ वर्ग नगरपरिषदासाठी अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख तर ‘ब’ वर्ग नगरपरिषदांसाठी २० लाख, १५ लाख, १० लाख आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदांसाठी अनुक्रमे १५ लाख, १० लाख व पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.