राजकीय श्रेय‘वादा’वर पडदा

गेल्या ११ वर्षांपासून नूतनीकरणासाठी बंद असलेला चेंबूरमधील जलतरण तलाव अखेर सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी या तलावाची पाहणी केली. भाजपने या तलावाचे आधीच उद्घाटन करण्याचे मनसुबे रचले होते. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या आदेशांनंतर युतीला धक्का लागू नये, यासाठी भाजपने माघार घेतल्याची चर्चा आहे.

चेंबूरमधील पालिकेच्या ‘एम-पश्चिम’ कार्यालयालगत जनरल अरुणकुमार वैद्य तलाव असून १९९२ मध्ये हा तलाव बांधण्यात आला होता. मात्र पालिकेकडून तलावाची योग्य ती देखभाल न झाल्याने काही वर्षांतच त्याची दुरवस्था झाली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पालिकेने २००७ मध्ये हा तरणतलाव सर्वसामान्यांसाठी बंद केला होता. येथे उत्तम दर्जाचा तलाव पालिकेने बांधावा अशी मागणी राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्यांकडून करण्यात येत होती. मात्र पालिकेने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. अखेर पालिकेने तलावासाठी निधी मंजूर करत २०१५ला तलावाचे बांधकाम सुरू केले. १८ महिन्यांमध्ये या तलावाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र कंत्राटदाराने तलावाचे काम पूर्ण करण्यास सव्वातीन वर्षांचा अवधी लावला. त्यानंतरदेखील पालिकेकडून हा तलाव सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात येत नव्हता. याबाबत ‘लोकसत्ता’ने ८ ऑगस्ट रोजी ‘चेंबूरमधील ऑलिम्पिक दर्जाच्या तलावाची रखडकथा’ हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर तात्काळ पालिकेने तलावाच्या उद्घाटनाची तयारी केली. १८ ऑगस्टला या तलावाचे मोठय़ा थाटामाटात उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा सोहळा रद्द झाल्याचे जाहीर करीत या तलावाच्या उद्घाटनाची घोषणा केली. सोमवारी सकाळी ११ वाजता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे या तलावाच्या पाहणीसाठी येणार होते. त्यामुळे या विभागातील भाजप नगरसेविका आशा मराठे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी १० वाजताच या तलावाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र रात्रीच वरिष्ठांकडून आदेश आल्यामुळे भाजपने हा कार्यक्रम रद्द केला.