मुंबई : माझ्या बाबतीत घडलेल्या विनयभंग प्रकरणातील साक्षीदाराला धमक्या देण्यात येत असल्याची माहिती अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
दरम्यान, ओशिवरा पोलिसांनी मात्र अद्याप अशा प्रकारची तक्रार आलेली नाही किंवा तक्रारदारही पुढे आलेला नाही, असे स्पष्ट केले.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये तनुश्री यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह चौघांविरोधात विनयभंगाची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. ‘हॉर्न, ओके, प्लीज’ या चित्रपटातील गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान पाटेकर यांनी असभ्य वर्तन केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी पाटेकर यांच्यासह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माते सामी सिद्धिक आणि दिग्दर्शक राकेश सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत काही साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टीस्ट असोसिएशन’चे तत्कालिन पदाधिकारी आणि चित्रीकरणादरम्यान उपस्थित असलेल्या काहींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी काही साक्षीदारांचे जबाब पोलीस नोंदवणार आहेत. यापैकी एका साक्षीदारावर आरोपी दबाव आणत आहेत, त्याला धमक्या दिल्या जात आहेत, अशी माहिती तनुश्री यांनी निवेदनाद्वारे दिली.
या प्रकारांमुळे साक्षीदार दडपणाखाली असून पोलिसांना त्याबाबत माहिती दिल्याचे तनुश्रीचे वकील अॅड्. नितीन सातपुते यांनी सांगितले. तसेच आरोपी आणि निवडक साक्षीदारांच्या नार्को अॅनालीसीस, लाय डिटेक्टर चाचण्या केल्यास सत्य उजेडात येऊ शकेल, असेही अॅड. सातपुते यांनी सांगितले. त्यासाठी आपण यापुर्वीच पोलीस ठाण्यात अर्ज केल्याचे ते म्हणाले.
साक्षीदाराला येणाऱ्या कथित धमक्यांबाबत ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवार यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप अशी तक्रार आलेली नाही, साक्षीदारही पुढे आलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.