टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याच कारणही तसंच आहे, चंद्रशेखरन यांनी मुंबईत एक लक्झरी डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याची किंमत ९८ कोटी रुपये आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोड या लक्झरी टॉवरमध्ये हा फ्लॅट आहे. गेल्या पाच वर्षापासून चंद्रशेखरन आपल्या कुटुंबासोबत या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. विषेश म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानींचे घर ‘एंटीलिया’ या इमारतीच्याबाजूलाच हा टॉवर आहे.


दरमहा २० लाख रुपये होते भाडे
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण मुंबईत जसलोक रुग्णालयाजवळ ही २८ मजली इमारत आहे. ६,००० स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट आहे. २०१७ साली चंद्रशेखरन टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यानंतर ते या फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. २० लाख रुपये दरमहा भाडे ते या फ्लॅटसाठी द्यायचे.


आत्तापर्यंतची हाय प्रोफाईल डील
एन. चंद्रशेखर, त्यांच्या पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या नावाने हे घर खरेदी करण्यात आले. १.६ लाख रुपये प्रतिस्क्वेअर फूट या दराने हा ड्युप्लेक्स विकत घेण्यात आला आहे. समीर भोजवानी यांच्या जीवेश डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून चंद्रशेखरन यांनी हा फ्लॅट विकत घेतला आहे. २००८ साली ही इमारत बांधण्यात आली आहे. मार्केट तज्ञांच्या मते अशा मोठ्या डील खूप कमी प्रमाणात होतात. मुंबईमध्ये जानेवारी २०२२ वर्षात आतापर्यंत अशा प्रकारचे केवळ १३ हाय व्हॅल्यू करार झाले आहेत. प्रॉपर्टी मार्केटमध्ये ही एक हाय प्रोफाईल डील म्हटली जात आहे.