शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याचा निर्णय टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी घेतला आहे. त्यानुसार टाटा उद्योग समूहातर्फे प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ५०० शाळांमध्ये ई-लर्निगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई- पुण्यातील इंग्रजी माध्यमाच्या हायफाय शाळांमध्ये हजारो रुपये शुल्काच्या मोबदल्यात मिळणारे हे शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मात्र मोफत मिळणार आहे. पुढील महिन्यात या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असून तो यशस्वी ठरताच त्याची अंमलबजावणी राज्यातील ८५ हजार शाळांमध्ये केली जाणार आहे.
राज्यातील शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याबरोबर शिक्षणाचा दर्जाही चांगला व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना आता रतन टाटांचीही साथ मिळाली आहे. टाटा उद्योगसमूह सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून शालेय विद्यार्थ्यांना ई-लर्निगचे मोफत धडे देणार आहे.
उद्योगपती रतन टाटा आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. टाटांच्या प्रमुख उपस्थितीत सह्य़ाद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव एस. जे. सहारिया, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी, शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
विद्यार्थाना चांगल्या दर्जाचे मात्र सहज सोप्या भाषेत समजणारे शिक्षण द्यावे यासाठी टाटा उद्योग समूहाच्या ‘टाटा क्लास एज्ड’ तर्फे खास सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये सर्व शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम आणि मराठीसह सर्व प्रमुख भाषांचा समावेश आहे. त्यानुसार राज्यातील ५०० शाळांमध्ये ई-लर्निगच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. पहिल्या टप्यात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद विभागात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. राज्य सरकारने २०० शाळामध्ये ई-लर्निगची सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले असून बहुतांश शाळामध्ये ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तर ३०० शाळांमध्ये टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून ही सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या शाळांमधील शिक्षकांना ई-लर्निगचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकविले जाईल. त्यासाठीचे सॉफ्टवेअर आणि आवश्यक बाबींच्या खर्चाची जबाबदारीही टाटांनीच उचलली आहे.
आजच्या बैठकीत ई-लर्निगबाबत र्सवकष चर्चा झाली. त्याबाबतच्या सामंजस्य करारावर लवकरच सह्य़ा होणार असून पुढील महिन्यात हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शालेश शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी सांगितले.
पर्यटन आणि विमानसेवांमध्येही पुढाकार
राज्यात पर्यटन व्यवसायालाही वाव असल्यामुळे पर्यटनास गती देण्यासाठी टाटांनी पुढाकार घेतला असून कोणत्या कोणत्या भागांत पर्यटनास चालना देता येईल, याचा अभ्यास टाटा उद्योग समूह करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालये विमान सेवेने जोडण्याबाबतही हा उद्योग समूह व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एकत्रित काम करण्याबाबतही या बैठकीत निर्णय झाला.