मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि टाटा समूहाचे मुख्यालय अशी ओळख असलेल्या बॉम्बे हाऊस या इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर टाटा समूहाचे कामकाज नव्या बॉम्बे हाऊसमधून सुरू होणार आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या ११४व्या जयंतीचा मुहूर्त साधत रविवारी रतन टाटा यांनी इमारतीचे उद्घाटन केले. त्यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

१९२० साली जमशेटजी टाटा यांचे पुत्र आणि टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष सर दोराबजी टाटा यांनी मुख्यालयाच्या इमारतीसाठी महापालिकेकडून भूखंड विकत घेतला. प्रख्यात वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांच्याकडे इमारत बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाची (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) इमारत उभारणाऱ्या जॉर्ज यांनी १९२४मध्ये बॉम्बे हाऊस ही चार मजली ऐतिहासिक वास्तू उभारली. ९४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच या इमारतीचे नूतनीकरण हाती घेण्यात आले. त्यानंतर समूहातील उपकंपन्यांची कार्यालये अन्य इमारतीत हलविण्यात आली.  बाह्य़ सौंदर्य आणि मुख्य वास्तू तशीच ठेवून इमारतीत अंतर्गत बदल करण्यात आले आहेत.

हा ऐतिहासिक क्षण आहे. समूहाचे माजी अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या जयंतीदिनी नव्या, आवश्यक बदलांसह सज्ज असलेल्या मुख्यालयाचे उद्घाटन होत आहे, अशी प्रतिक्रिया टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन व्यक्त करतात. ऐतिहासिक वारसा जतन करतानाच भविष्यातील व्यावसायिक गतिमानता, कर्मचाऱ्यांना सहजरीत्या काम करण्यासाठीचे पोषक वातावरण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था डोळ्यांसमोर ठेवून इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले, अशी माहितीही चंद्रशेखरन देतात.

काय आहे नव्या वास्तूत?

इमारतीच्या तळमजल्यावरील मोकळ्या जागेत कॅफे लाऊंज आणि कर्मचाऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी उपाययोजना आणि टाटा समूहाने उद्योग जगतात शून्यापासून घेतलेल्या भरारीचा रोमहर्षक माहिती सांगणारे डिजिटल संग्रहालय (टाटा एक्स्पिरियन्स सेंटर) असेल. टाटा समूहाला आजवर लाभलेले नेतृत्व, त्यांचे उद्योगजगतातील योगदान, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचे विचार, समूहाचा प्रवास आणि भविष्यातील आडाखे या संग्रहालयाद्वारे कर्मचारी आणि अभ्यागतांना माहिती मिळू शकेल. मुख्यालयाच्या कानाकोपऱ्यात जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशाने कसा उजळेल यानुसार इमारतीच्या अंतर्गत भागांची पुनर्रचना करण्यात आली. कार्यालयात उत्साही वातावरण राहावे यासाठी प्रत्येक भिंत छायाचित्र, चित्रांसह विविध कलाकृतींनी सजवण्यात आल्याचे टाटा समुहाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मजल्यावर डीजीटील मिटींग रूम, कंपन्यांमधील चमू एकत्रितरीत्या सहजतेने काम करू शकतील, अशी अत्याधुनिक उपाययोजना इमारतीत असेल.