अभिजीत ताम्हणे

नाटक, चित्रकला, संगीत, कविता या कलांच्या संदर्भात ‘काळ’ आणि ‘अवकाश’ या संकल्पनांचा मागोवा घेणं हा त्या-त्या कलेचा अनुभव असतो आणि ‘आत्ता’चा क्षण जगल्याशिवाय हा अनुभव येऊ शकत नाही, असे सूत्र मांडतानाच, या ‘आत्ता’चे अनंततेशी नाते असते ते कसे, याचा पुनशरेध ज्येष्ठ नाटककार आणि यंदाच्या ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ साहित्योत्सवातील प्रतिष्ठेच्या ‘कारकीर्द-गौरवा’चे मानकरी महेश एलकुंचवार यांनी शनिवारी मुंबईकर श्रोत्यांपुढे तासाभरच्या व्याख्यानात मांडला.

mumbai heatwave alert marathi news,
मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, रायगड जिल्ह्यात आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
The election commission rejected the Thackeray group reconsideration petition regarding the campaign song
‘जय भवानी’वरील बंदी कायम; प्रचारगीताबाबत ठाकरे गटाची फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Vande Bharat, Tejas Express,
पावसाळ्यात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार

या साहित्योत्सवातील ‘कारकीर्द गौरव’ मानकऱ्यांची मांदियाळी रस्किन बॉण्ड, गिरीश कार्नाड, किरण नगरकर, शांता गोखले, व्ही. एस. नायपॉल अशी आहे आणि प्रत्येकाने कलाविषयक चिंतन आपापल्या व्याख्यानातून मांडल्याचा ताजा इतिहास या महोत्सवाला आहे. एलकुंचवार यांच्या इंग्रजी व्याख्यानाचा विषय ‘कलांमधील काळ आणि अवकाश’ असा होता. व्याख्यान सुरू झाले तेव्हा एलकुंचवारांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शिका विजया मेहता यांच्याकडे निर्देश केला. मनातली पात्रे, त्यांचे सारे संवाद कागदावर उतरवत नाटक लिहिले, पण आपली नाटके विजयाबाईंनी- ‘रंगायन’तर्फे जेव्हा रंगमंचावर आणली, तेव्हा त्यातील काळ आणि पात्रांमधला तसेच संवादांमधला अवकाश यांची जाणीव होत गेली, असे सांगून एलकुंचवारांनी या अवकाशाचे विवेचन केले. अवकाश म्हणजे मधले अंतर असा अर्थ घेतला तरी हे अंतर केवळ दोन संवादांच्या मधले, दोन पात्रांच्या मधले की त्याही पलीकडचे, असा प्रश्न या विवेचनातून उपस्थित होत असताना त्याचे उत्तरही पुढे मिळाले..

नाटक पाहताना येणारा रंगमंचावरल्या अवकाशाचा अनुभव हा केवळ दृश्य अनुभवच असतो असं नाही. तो अवकाशाच्या आणि काळाच्याही संक्षेपाचा अनुभव असू शकतो, हा मुद्दाही पुढे स्पष्ट झाला. तिथवर श्रोत्यांना नेण्याआधी, एमिली डिकिन्सन हिच्या कवितांमधला अवकाश आणि सुधीर पटवर्धन तसेच प्रभाकर कोलते यांनी दिलेला चित्रांमधल्या अवकाशाचा अनुभव, मग अकबर पदमसी यांच्याशी झालेली भेट (तेव्हा पदमसी ‘मेटास्केप’ नावाची मालिका करत), ‘कलाकृती समजणं नव्हे- अनुभवणं महत्त्वाचं’ याची आलेली जाण आणि ‘कविता समजण्याआधी ती भिडते’ हा प्रत्येकालाच होऊ शकणारा साक्षात्कार, याविषयी ते बोलत होते. शब्दांवर अवलंबून असलेल्या कलाकृतीतूनही नाद आणि लय भिडते, तर संगीत ऐकताना या लयीची ताकद स्वरांमधून उमगते, असे सांगताना ‘अनुभवा’ची नश्वरता/ शाश्वतता, त्याचा अवकाश यांची कलाप्रकारानुसार बदलणारी परिमाणं एलकुंचवार उलगडत होते. ‘जगणं हाच मुळात आभास- कापरासारखा उडून जाणारा.. त्यात नाटक ही तर आभासावरच आधारित कला. परंतु प्रेक्षक नाटक पाहातात तेव्हा ही दोन्ही नश्वर क्षेत्रं एकजीव होतात,’ हे काही या भाषणातील मुख्य प्रतिपादन नव्हते, किंवा ‘ज्येष्ठ (आता दिवंगत) नृत्यगुरू रोहिणी भाटे यांना मी विचारलं, बेबीताई, वय नाही आडवं येत? तेव्हा त्या म्हणाल्या की, मी फक्त आत्ताच्या क्षणाचा विचार करते,’ ही तर वरवर पाहाता व्यक्तिगत आठवणच होती. ‘काळाचा संक्षेप’ या संकल्पनेचा थेट उल्लेख या भाषणात नव्हता. पण ‘एकजीवपणा’ कुठून येतो? कला ‘आत्ता’च्या क्षणाकडे नेते म्हणजे काय? या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे त्यात दडली होती. ‘माझ्यावर उगाच उजव्या विचारांचा वगैरे शिक्के नका मारू..’, किंवा ‘हल्ली संस्कृत अवतरणं उद्धृत केली की लोक तुमच्या राजकीय हेतूंची चिकित्सा करू लागतात.. ’ ही विधाने श्रोत्यांमध्ये खसखस पिकवणारी.. पण आपल्या आजच्या काळावर नेमक्या कोणत्या गुंगीचा अंमल आहे, यावर नेमके बोट ठेवणारी होती आणि आपला सार्वजनिक अवकाश संकुचित आहे- तो मोकळा करण्याची सुरुवात स्वत:लाच हसून करू या, याचा साक्षात् प्रयोग करणारीदेखील!

एलकुंचवारांच्या अवतरणांमध्ये बृहदारण्यकातले ‘पूर्णमिदं पूर्णमदं’ होते, एकनाथी भागवतातले ‘देखणे होऊनि सर्वागी’ होते.. पण त्यामागे एलकुंचवारांचा रोख काय होता? कलावंताने ‘आत्ता’ असे सायुज्य साधायचे- ‘भूतकाळ आणि भविष्यकाळाची दोन पाती आपला वर्तमान कातरू पाहात असतात’ हे ओळखून जगत राहायचे, ते कशासाठी? मग ‘अनंतता’ म्हणजे काय? कलावंताने अनंताचा शोधयात्री व्हायचे असते ना? या प्रश्नांची उत्तरे या व्याख्यानातून मिळाली. काम्यू, एमिली डिकिन्सन यांच्याप्रमाणेच मीसुद्धा अनंताचा शोध घेतो आहे. पण ‘आत्ता’ हीच अनंतता असते, ही जाणीव व्हायला हवी, असे ते म्हणाले. ‘ऊध्र्वमूल अध:शाख..’ अशा त्या िपपळाप्रमाणे आपली मुळे आकाशाकडे- अनंताकडे जाणारी असल्यानं आपण पाश्चात्त्यांपेक्षा निराळे आहोत, अनंताच्या पाश्चात्त्य शोधयात्रींनी युद्धोत्तर काळात- संहार पाहिल्यानंतर- आत्महत्या केल्या, पण आपला आत्मशोध आणि अनंताचा शोध यांत अंतर नसतं.. हे दोन्ही ‘आत्ता’मध्ये असतं. वासुदेव गायतोंडे, रोहिणी भाटे, धोंडुताई कुलकर्णी यांना ही जाणीव होती असं त्यांची कला सांगते आणि हे सारे जण अखेर शांतवले, जगण्याचं भागधेय जणू त्यांच्यापुरतं गैरलागू होण्याचा- विरून जाण्याचा क्षण आला. या आत्ताच्या क्षणांमधून होणारा प्रत्येकाचा प्रवास एकाकीच असतो.. हे सारे सांगताना एलकुंचवार म्हणत होते, ‘मी आत्ता कुठे ८३ वर्षांचा आहे.. आणखी १७ तरी वर्ष आहेत मला..’
काळ आणि अवकाश या केवळ समीक्षकी परिभाषेतल्या संकल्पना नसून कलावंताच्या किंवा जगण्यातली सक्रियता हवी असणाऱ्यांच्या जगण्याशी त्या भिडतात, हा विश्वास या व्याख्यानाने दिला. मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांची गर्दी इथे झाली होती, त्यांना कदाचित, ‘यशा’च्या आग्रहापेक्षा शुद्धता आणि प्रामाणिकपणाचा ध्यास महत्त्वाचा असल्याचा संदेश याच भाषणातून मिळाला असावा.