मुंबईसह उपनगरांत प्रचंड मागणी असलेल्या ओला आणि उबर या खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांविरोधी आंदोलन पुकारणाऱ्या स्वाभिमान संघटनेने आपले आंदोलन बुधवारी मागे घेतल्याने गुरुवारी सकाळपासून टॅक्सी सेवा पूर्ववत झाली. दरम्यान, गुरुवारी स्वाभिमान वगळता इतर टॅक्सी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने परिवहन सचिवांना पत्र देत अॅप आधारित टॅक्सींवर कारवाई करण्याची मागणी केली. या कंपन्यांबाबत १५ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास स्वाभिमान संघटनेने पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी स्वाभिमानसह इतर संघटनांनाही आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार उबर-ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांसाठीही नियमावली तयार करण्यात येणार आहे. ही नियमावली येत्या १५ दिवसांत लागू करण्यात येईल, असेही सेठी यांनी म्हटले होते. त्यानुसार स्वाभिमानने आंदोलन मागे घेतल्याचे बुधवारी रात्री जाहीर केले. दरम्यान, अन्य चार टॅक्सी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने परिवहन सचिव गौतम चटर्जी यांची भेट घेत अशा समन्वयक कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. समन्वयक कंपन्यांबाबत लवकरच कायदा येणार असून या टॅक्सींचे दरही महानगर वाहतूक प्राधिकरणातर्फे ठरवले जातील, असे आश्वासन चटर्जी यांनी दिल्याचे समितीचे निमंत्रक एल. क्वाड्रोस यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2015 रोजी प्रकाशित
टॅक्सींचा संप मागे, ओला-उबर विरोध मात्र कायम
खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांसाठीही नियमावली तयार करण्यात येणार आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 04-09-2015 at 01:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxi strike end but uber cab still oppose