औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या क्षयाच्या रुग्णांसाठी मुंबई महापालिकेची अभासी उपचार केंद्रे
मुंबई: औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या ‘मल्टीड्रग रेझिस्टंट’ आणि ‘एक्सटेन्सिव्ह ड्रग रेझिस्टंट’ अशा क्षयरोगामध्ये अनेक गुंतागुंत असते. अशा रुग्णांना पालिकेच्या प्रमुख क्षयरोग केंद्रामध्ये हेलपाटे घालावे लागू नये यासाठी घराजवळील क्षयरोग केंद्रामध्येच योग्य उपचार मिळावेत म्हणून पालिकेने अभासी उपचार केंद्रे (व्हर्च्युअल टीबी क्लिनिक) हा नवा उपक्रम गुरुवारी सुरू केला आहे. ‘ड्रग रेझिस्टंट’ (डीआर) क्षयरोगाची बाधा झालेल्या रुग्णांसाठी मुंबईत २४ उपचार केंद्रे उपलब्ध आहेत.
बाधित रुग्ण या रुग्णालयांमध्ये जात असल्यामुळे त्यांच्यामार्फत क्षयरोग प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. तसेच त्यांना अधिक काळ ताटकळत बसावे लागते. त्यामुळे घराजवळील क्षयरोग केंद्रामध्ये ही सुविधा सुरू केल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. रुग्णांना थेट पाठविण्याऐवजी संबंधित नोडल क्षयरोग केंद्रांना ‘ई मेल’द्वारे रुग्णांची माहिती आणि उपचारातील अडचणी याची माहिती कळविली जाईल. नोडल क्षयरोग केंद्रावरील डॉक्टर यानुसार संबंधित डॉक्टरांना उपचारासाठी मार्गदर्शन करतील, अशी या क्लिनिकची रचना असणार आहे. माहिती वेळेत पोहचविणे आणि नोडल केंद्रामार्फत वेळेत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाला वेळेत योग्य उपचार सुरू केले जातील, असे पालिकेच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणीत टिपरे यांनी सांगितले. रुग्णांच्या उपचारामध्ये आलेल्या अडचणी, नोडल अधिकाऱ्यांनी केलेले मार्गदर्शन याबाबत महिन्यातून एकदा चर्चा केली जाणार आहे.
‘क्लिनिक’चे फायदे
- पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत रुग्ण पाठविण्याचे प्रमाण कमी होईल.
- क्षय रुग्णांचा प्रवास कमी झाल्याने संसर्ग होण्याचा धोका टळेल.
- जिल्हा स्तरावरील विशेष तज्ज्ञ व आरोग्य कर्मचारीही सक्षम होतील.
- लवकरात लवकर योग्य उपचार शक्य होईल.
खासगी डॉक्टरांचाही सहभाग
‘व्हर्च्युअल क्लिनिक’साठी mum-dt3c@gmail.com हा स्वतंत्र ‘ई मेल’ आय डी केला आहे. खासगी डॉक्टरांनाही त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या ‘डीआर’ रुग्णांच्या उपचारामध्ये अडचणी येत असल्यास या ‘ई-मेल’द्वारे मार्गदर्शन घेता येईल. त्यामुळे खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध असेल, असे डॉ. प्रणीत टिपरे यांनी सांगितले.