उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या थंड कारभारामुळे शिक्षणसम्राटांवर कोणताही वचक राहिलेला नाही, अशी भावना अनेक महिने वेतनच न मिळाल्याने अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षक व्यक्त करू लागले आहेत. पुण्याच्या मारुती नवले यांच्या सिंहगड संस्थेतही अध्यापकांना सात महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे अखेर अध्यापकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. लोणावळा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील अडीचशे अध्यापकांनी धरणे आंदोलन केले.
लोणावळ्याप्रमाणेच पुण्यातील वारजे येथील व्यवस्थापन महाविद्यालय आणि वडगाव येथील सिव्हिल इंजिनीअरिंग महाविद्यालयातील अध्यापकांनीही वेतन मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले असून संस्थेच्या अन्य महाविद्यालयांतील अध्यापक-शिक्षकही काम बंद आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंहगडच्या लोणावळा संस्थेत गोल्फ क्लब उभारण्यासाठी मारुती नवले यांच्याकडे पैसे आहेत, परंतु शिक्षकांना पगार देताना सरकारकडे थकबाकी असल्याचे कारण ते पुढे करतात, असे अध्यापकांचे म्हणणे आहे. ‘सिटिझन फोरम’चे प्रमुख व आमदार संजय केळकर यांनी नवले यांच्या सिंहगड संस्थेसाठी मिळालेल्या जमिनी, त्यावरील बांधकामासह सर्वच कारभाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तथापि अध्यापकांच्या म्हणण्यानुसार बुधवारी सायंकाळी एक बेसिक पगार देण्यात आला असून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र सात महिन्यांचे पूर्ण वेतन मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार लोणावळा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांनी केला.

सिंहगड संस्थेच्या कोणत्याही महाविद्यालयात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेले नाही. कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन देण्यात आले असून वेतनाची थकबाकी आहे ती मार्चपर्यंत दिली जाईल.
– मारुती नवले