बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याला विशेष न्यायालयाने सुनावलेली दहा वर्षांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कमी करीत सात वर्षे केली. विशेष सीबीआय न्यायालयाने तेलगीला दोषी ठरवत दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणातील सहआरोपी संजय गायकवाड याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा पुढे आला नसल्याचे स्पष्ट करीत त्याला सुनावण्यात आलेली शिक्षा न्यायालयाने रद्द केली. परंतु त्याचवेळी आणखी एक सहआरोपी आणि तेलगीचा साथीदार रामरतन सोनी याच्या शिक्षेवर मात्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. विशेष न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती
विशेष सीबीआय न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला तेलगीसह गायकवाड आणि सोनी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांच्यासमोर त्यांच्या अपिलावर सुनावणी झाली.