मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूरजवळील चेरपोली गावाजवळ शुक्रवारी रात्री तीन दरोडेखोरांनी ९७ लाख रुपयांच्या इलेक्ट्रॅनिक्स वस्तू घेऊन जाणारा टेम्पो पळवला. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी तातडीने तपास करून सामानासह टेम्पो जप्त केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
राजकुमार यादव हा टेम्पो चालक एलईडी, एलसीडी, मोबाईल, हॅन्डीकॅम आदी ९७ लाख रूपये किमतीचे साहित्य घेऊन मुंबईहून नाशिककडे शुक्रवारी रात्री चालला होता. शहापूरजवळील चेरोपोली या आडवळणावरील गावाजवळ रात्री आठच्या सुमारास चोरटय़ांनी टेम्पो अडवला. त्यानंतर यादवला धमकावून त्याच्याकडील पैसे काढून घेतले आणि सामानासह टेम्पो पळवला.तसेच यादवला आटगाव फाटय़ाजवळ सोडून दरोडेखोर पळून गेले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तातडीने तपास करून सामानासह टेम्पो ताब्यात घेतला. याप्रकरणी साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सास्ते अधिक तपास करीत आहेत.