मुंबई : मालमत्ता बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा दक्षिण-मध्य मुंबईतील घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे, मात्र अद्यापही १०,७०० घरांची विक्री झाली नसल्याचे समोर आले आहे.

वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, ताडदेव, लोअर परळ या भागांचा दक्षिण- मध्य मुंबईत समावेश येतो. या भागात घरांची मागणी जास्त असून येथे महागडी घरे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतात. अ‍ॅनारॉकच्या आकडेवारीनुसार २०१३ ते २०२१ पर्यंत २५,६०० घरे या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध झाली. त्यातील १७,२१० घरे विकली गेली तर उर्वरित घरे विक्रीविना पडून आहेत.

मागील वर्षीपर्यंत दक्षिण मध्य मुंबईत ११,९०० घरे विक्रीविना पडून होती, मात्र या वर्षभरात (२०२०-२१) येथील घरांच्या विक्रीत काहीशी वाढ झाल्याचे दिसत आहे. शिल्लक घरांपैकी साधारण दहा टक्के  घरांची विक्री झाली आहे. मात्र त्यानंतरही अद्याप  १०,७०० घरांना ग्राहक मिळाले नसल्याचे ‘अ‍ॅनारॉक’च्या अहवालातील आकडेवारीनुसार दिसत आहे. म्हणजेच एका वर्षांत विनाविक्री पडून असलेल्या घरांच्या संख्येत १० टक्क्य़ांनी घट झाली आहे. वर्षभरात १९१० घरे विकली गेली असून ही दिलासादायक बाब असल्याचे ‘अ‍ॅनारॉक’कडून सांगितले जात आहे.

गेल्यावर्षी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात केली, तर दुसरीकडे अनेक विकासकांनीही मुद्रांक शुल्काचा ग्राहकांवरील भार कमी केला. तसेच अन्य सवलतीही दिल्या. त्यामुळेच या वर्षभरात दक्षिण-मध्य मुंबईतील विक्री न झालेल्या घरांचा आकडा १० टक्क्य़ांनी घटल्याची माहिती ‘अ‍ॅनारॉक’चे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली. आता या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांपैकी २९ टक्के घरे ही १५०० ते २००० चौ. फुटांची आहेत, तर २३ टक्के घरे १००० ते १५०० चौ. फुटांची आहेत. मोठी ३००० ते ४००० चौ फुटांची ५ टक्के अर्थात ५३५ घरे आहेत.

एसटी संपामुळे प्रवासी वेठीस

सकाळी एसटी सुटत असल्याने काही कामगारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे परळ व कुर्ला नेहरू नगर आगारातून एसटी सुटणे बंद झाले. मुंबई सेन्ट्रल आगारातूनही तुरळक प्रमाणात सेवा सुरू होती.

परिणामी दिवाळी आणि आठवडा अखेरच्या सलग सुट्टय़ांनंतर कामाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबई महानगरातील नोकरदार वर्गाला या संपाचा फटका बसला. एसटी उपलब्ध नसल्याने अनेकजण आगारातील चौकशी खिडक्यांवर येऊन चौकशी करत होते. लशीची एकच मात्रा घेतलेल्या किंवा लस न घेतलेल्यांना मुंबई महानगरात प्रवास करताना एसटी एक पर्याय ठरते. परंतु तो पर्यायही नसल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.