राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून नव्याने सुरू झाली असून नव्या प्रणालीमध्ये अर्ज करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पहिल्याच फेरीत जातवैधता प्रमाणपत्रे द्यावी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आधीच्या प्रवेश प्रक्रियेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याची वेळ प्रवेश नियमन प्राधिकरणावर यंदा आली. गेली काही वर्षे प्रवेश प्रक्रिया करणाऱ्या संस्थेत यंदा प्राधिकरणाने बदल केला. प्रत्येक विद्याशाखेनुसार अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ होते. मात्र यंदा चारही प्रमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सार’ प्रणाली तयार करण्यात आली होती. सातत्याने तांत्रिक अडचणी आल्यामुळे अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीत लाखो विद्यार्थ्यांपैकी १० ते १५ हजार विद्यार्थीच प्रक्रिया पूर्ण करू शकले. त्यामुळे अखेर प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली. आता पुन्हा एकदा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रत्येक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक

विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज करता येतील, तर २५ जून ते १ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर ६ ते ८ जुलैदरम्यान महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देता येतील. पहिली प्रवेश यादी १० जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ११ ते १४ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांनी मदत केंद्रावर नोंदणी करायची आहे, तर १२ ते १५ जुलैदरम्यान मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर १६ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचे तपशील जाहीर करण्यात येतील, तर २० जुलै रोजी दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. तीन प्रवेश फेऱ्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण होऊन १ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होतील.

विद्यार्थ्यांना शुल्क परत

‘सार’ प्रणालीतील प्रवेश रद्द झाल्यानंतर आता या प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्काचे तपशील प्राधिकरणाने जाहीर केले असून येत्या दोन दिवसांत त्यांचे शुल्क जमा होणार आहे. नव्याने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागेल.

जातवैधता प्रमाणपत्राबाबत विद्यार्थी गोंधळात

विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये जातवैधता प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी यापूर्वी दुसऱ्या फेरीपर्यंत म्हणजे १३ जुलैपर्यंत मुदत होती. आता मात्र १ जुलैपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. विशेषत: मराठा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणारे विद्यार्थी गोंधळात आहेत. त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढले असले तरी जातवैधता प्रमाणपत्र द्यावे लागेल का याबाबत संभ्रम आहे. इतर प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये जातवैधता प्रमाणपत्रे मिळण्यासाठी बराच कालावधी लागत आहे.