संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोलशेत परिसरात बिबटय़ांची दहशत कायम असून सापळे निरुपयोगी ठरल्यानंतर आता त्यांना पकडण्यासाठी भूल देण्याची व्यूहरचना वनविभागाने आखली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोलशेत, वायुदल तसेच नाविक दल वसाहत, डोंगरीपाडा, पातलीपाडा, ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट या परिसरातील तब्बल दीड-दोन लाख ठाणेकर बिबटय़ाच्या दहशतीखाली जगत आहेत. पूर्वी एक नर आणि मादी असे दोनच बिबटे या भागात होते, परंतु परवा बिबटय़ाच्या एका बछडय़ाने कुत्र्याची शिकार केल्याचे निष्पन्न झाल्याने या परिसरात आता नर-मादी आणि त्यांचे बछडे असे तीन किंवा चार बिबटे असावेत, असा अंदाज या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. वनविभागातील सूत्रांनीही या शक्यतेस दुजोरा दिला आहे.
वन्यप्राणी गणनेनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २५ बिबटे असून, त्यातील एक नर-मादी गेले सहा महिने कोलशेत परिसरात दिसू लागली आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात वस्ती असून बिबटय़ाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रात्री सुरक्षारक्षकांनी अनेकदा बिबटय़ा पाहिला आहे. हिरानंदानी इस्टेट वसाहतीच्या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातही तो स्पष्टपणे दिसतो आहे.
विशेष म्हणजे शाळेच्या मैदानातही त्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे संध्याकाळी या भागात लहान मुलांना एकटे सोडले जात नाही. बिबटय़ांना वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी फटाके अथवा डबे वाजवावेत, अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत. सध्या बिबटय़ांनी या परिसरातील भटक्या कुत्र्यांना लक्ष्य केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी वन अधिकाऱ्यांनी ठाण्यातील लोकप्रतिनिधी तसेच दक्ष नागरिकांबरोबर केलेल्या पाहणीच्या वेळीही बिबटय़ा दिसल्याची माहिती सहायक वनसंरक्षक सुधीर पडवळे यांनी दिली.
बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यात अडचणी मोठय़ा..
नागरिकांचे समाधान वनखात्याच्या वतीने वन्यप्राणी मित्र संस्था करत होत्या. बिबटय़ाला पकडणे हा या समस्येवरील उपाय होऊ शकणार नाही, एक बिबटय़ा गेल्यानंतर तेथे दुसरा बिबटय़ा येतो. शहरी भागात पिंजरा बसवल्यास त्यामध्ये खेळणाऱ्या लहान मुलांचा अपघात होऊ शकतो. बिबटय़ा पकडण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. ठाण्यातील बिबटय़ा पकडण्यासाठी परवानगी मिळाली असून त्या दृष्टीने तीन ठिकाणी पिंजरे बसवण्यात आले आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून हा बिबटय़ा हुलकावणी देत असल्याचे वनखात्याच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.