मुंबईतल्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी येऊन केली अटक; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

या दहशतवाद्याला रेल्वेचं तिकीट बुक करुन देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

dilip-Walse-patil
(Photo- Twitter)

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एकाचं मुंबई कनेक्शन आता प्रकाशात आलं आहे. एवढंच नाही तर दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संध्याकाळी पाच वाजता एका बैठकीचं आयोजन केलं आहे. यात ते मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

या घडामोडींबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या प्रकरणाची माहिती घेण्याच्या संदर्भात मी बैठक बोलावली आहे. हे प्रकरण देशस्तरावरचं आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करुन मी माहिती घेईन आणि त्यानंतर यावर भाष्य करेन.

या दहशतवाद्यांनी घातपाताचा कट तडीस नेण्यासाठी अनेक ठिकाणी स्फोटकं पोहचवली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. तर कथित दहशतवादी जान मोहम्मदला मुंबई-दिल्ली ट्रेनचं बुकिंग करुन देणाऱ्या व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे. मुंबईसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट तपास यंत्रणांनी उधळून लावला आहे. मुंबईतल्या या जान मोहम्मदचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचंही सांगितलं जात आहे.

भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Terrorist found in mumbai by delhi police home minister dilip valse patil meeting vsk